प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची कामे पूर्ण करा- पालकमंत्र्यांनी घेतला मनपाशी संबंधित विषयांचा आढावा



अकोला,दि. 14(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज महानगरपालिकेशी संबंधित विषयांचा आढावा घेतला.

अकोला मनपा हद्दीत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्या घरांची कामे अपूर्ण आहेत व  तामत्रिक कारणांमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही, अशा तांत्रिक अडचणी त्वरित दूर करून घरकुलांची कामे पूर्ण करावे, असे निर्देश ना.कडू यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री ना.कडू यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका संबंधीत विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ.नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा,  अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

यावेळी मनपा हद्दवाढ झाल्याने ज्या ग्रामपंचायती मनपा हद्दीत समाविष्ट झाल्या त्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे मनपा सेवेत समायोजन करण्याबाबत चर्चा झाली. या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत सहानुभूतीने निर्णय घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावे. यासंदर्भात ज्या बाबी वरिष्ठ पातळीवर प्रलंबित आहेत त्या प्रश्नावर मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येईल. तसेच गुंठेवारी पद्धतीच्या भूखंडावर असलेले घरकुल प्रस्ताव लेआऊट करुन नियमानुकूलन करून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश ना.कडू यांनी दिले. तसेच शहरातील व्यापारी संकुलात तसेच सार्वजनिक ठिकाणी सर्वेक्षण करुन दिव्यांग व्यक्तिंना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ