कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनेचा लाभ द्या; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 



अकोला, दि.8 (जिमाका)- कोवीड -१९ महामारीमुळे विधवा झालेल्या महिलांचा शोध घेऊन त्यांचे पुनवर्सन करणे आवश्यक आहे. अशा विधवा महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात कृती दलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. पल्लवी कुळकर्णी,  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर,  परिविक्षा अधिकारी आशिष देऊळकर, संरक्षण अधिकारी सुनिल सरकटे, सुनिल लाडुलकर, हर्षाली गजभीये, विधी सेवा प्राधिकरणचे राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांनाचा शोध घेऊन त्याना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना लाभ द्या. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपण योजनेअंतर्गत त्यांचे पालनपोषण, यथायोग्य संरक्षण व संगोपन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 बाल कल्याण  समितीमार्फत जिल्हा व तालुक्यातील कोविड सेंटर येथे कोविडमुळे मृत्यू झालेल्या बालकांविषयी माहिती असलेले पोस्टर लावण्यात आले आहे. पालक गमावलेल्या बालकांविषयी माहिती सादर करण्यात आली. या संपर्क मोहिमेतून जिल्ह्यातील 50 वर्षाच्या वयोगटाखालील कोविडमुळे मृत्यू झालेल्या 160 कुटूंबाशी संपर्क साधण्यात आला. त्यापैकी 35 कुटूंबामध्ये 18 वर्षाखालील 74 बालकांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी 56 बालके हे बालसंगोपन योजनेसाठी पात्र ठरले.  पात्र असलेल्या बालकांना बाल संरक्षण योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ