अनुसुचित जमातीच्या मुला/मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना ; ३० जून पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

 अकोला,दि. १८ (जिमाका)- महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडुन राज्यातील अनुसुचित जमातीच्या १० विदयार्थांना परदेशात पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यानुसार सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या ज्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ हवा असेल त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले असून हे अर्ज भरण्याची  मुदत दि.३० जून पर्यंत आहे, असे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी कळविले आहे.

या योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीसाठी निकष खालील प्रमाणे-

        राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणेसाठी अनुसुचित जमातीच्या एकुण १० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी / अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचेअर्ज प्राप्त झाले तर यत्ता १२ वी व पदवी अभ्यासक्रमात मिळविलेल्या गुणांच्या आधारे प्राधान्य देण्यात येईल.

एम.बी.ए पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दोन, वैद्यकीय अभ्यासक्रमाकरीता पदवी व पदव्युत्तर प्रत्येकी एक, बी.टेक(इंजिनिअरींग) पदवी व पदव्युत्तर प्रत्येकी एक, विज्ञान पदव्युत्तर एक, कृषी पदव्युत्तर एक, अन्य अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर दोन असे एकूण १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

 शिष्यवृत्ती साठी नमुद केलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यासमोर नमुद केलेल्या संख्येच्या प्रमाणात मंजुर करण्यात येईल. वरील प्रमाणे संख्या निश्चित केली असली तरी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना  प्राधान्य देण्यात येईल. ज्या वेळी उमेदवार उपलब्ध होणार नाहीत त्यावेळी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्याचप्रमाणे वर नमुद केल्या प्रमाणे शिष्यवृत्तीस निश्चित केलेली संख्या/ क्षमता एका अभ्यासक्रमाकडुन दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी वापरली जाईल.

उमेदवाराची निवड करतांना भुमिहीन आदिवासी कुटुंबातील विद्यार्थी, दुर्गम भागातील विद्यार्थी तसेच आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यास प्राधान्य  देण्यात येईल.

विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्यासंबधी अधिवास प्रमाणपत्र ( नॅशनॅलीटी व डोमॉसीयल सर्टिफिकेट) सादर करणे आवश्यक आहे.

विद्यार्थी महाराष्ट्रातील अनुसुचित जमातीचा असावा. त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याकडुन जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्याने अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

या शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्याचे वय दि.१ जून २०२१ रोजी जास्तीत जास्त ३५ वर्षापर्यंत असावे तथापि विद्यार्थी नोकरी करीत असल्यास उच्चवयोमर्यादा ही ४० वर्षापर्यंत राहिल परंतु नोकरीत नसलेल्या विद्यार्थ्यास निवडीच्या वेळी प्राधान्य देण्यात येईल.

विद्यार्थ्यास परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठात प्रथम वर्षाकरीता प्रवेश मिळालेला असावा.

शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा जास्तीत जास्त सहा लाख रुपयांर्यंत राहिल. त्यासंबधी सक्षम अधिकाऱ्याचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

विद्यार्थी कोणत्या दिनांकास व कोणत्या विमानाने परदेशात जाणार आहे याची माहिती आयुक्तालयास दिल्याशिवाय त्याला परदेशात जाता येणार नाही.

१० शिष्यवृत्ती आदिवासी कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस ( मुलगा/मुलगी) आणि एकाच अभ्यासक्रमास अनुज्ञेय राहील.

११ शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने निवडलेला अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास, अभ्यासक्रमासाठी शासना मार्फत खर्च करण्यात आलेली संपुर्ण रक्कम त्याचे कडुन वसूल करण्यात येईल. तसेच सदर अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर भारतात परत येणे किंवा किमान पाच वर्ष भारतात सेवा करणे बंधनकारक राहिल या अटी मान्य असल्यासंबधी विद्यार्थ्यास लेखी हमीपत्र (बॉण्ड) दोन जामीनदारासह सादर करावे लागेल.

१२ परदेशात अभ्यासक्रमासाठी एकदा निश्चित केलेला कालावधी वाढवता येणार नाही अथवा शिष्यवृत्तीस मंजुरी घेतेवेळी जो अभ्यासक्रम निवडला आहे त्यात बदल करता येणार नाही. विद्यार्थ्याने निवडलेला अभ्यासक्रम व त्याचा कालावधी अर्जात स्पष्टपणे नमुद करणे आवश्यक आहे.

१३ अभ्यासक्रम संपल्यानंतर संबधीत विद्यार्थ्याने त्वरीत भारतात येवुन त्याचे अंतिम परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र आयुक्त, आदिवासी विकास नाशिक  यांना सादर करणे आवश्यक राहील. तसेच सध्या करीत असलेल्या व्यवसायाची माहिती दयावी.

१४ नोकरीत असलेल्या विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीसाठी सादर करावयाचा अर्ज त्याच्या नियोक्त्यांमार्फत सादर करणे बंधनकारक राहिल.

१५ परदेशात ज्या विदुआपीठात  विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला आहे त्या विद्यापीठास व संस्थेस ऑनलाईन प्रणालीनुसार डायरेक्ट खात्यावर ट्युशन फि जमा करण्यात येईल. तथापि, निर्वाह भत्ता विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

१६. शिष्यवृत्ती साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यास, परदेशातील निवास हा अभ्यासक्रमाचा कालावधी पलीकडे कोणत्याही परिस्थितीत वाढविता येणार नाही.

१७. संबधीत विद्यार्थ्याने अगोदरच्या वर्षाचे गुणपत्रक , विद्यापीठ फी व निवास फी अदा केल्याबाबत प्रमाणित प्रत दिल्यानंतरच पुढिलवर्षाची शिष्यवृत्ती आयुक्त, आदिवासी विकास हे मंजुर करतील.

१८. अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्यावर परदेशातील वास्तव्यासाठी कोणताही पत्रव्यवहार आयुक्तालयामार्फत केला जाणार नाही अथवा त्यासाठी कोणताही जादा निधी मंजुर केला जाणार नाही.

१९. परदेशातील ज्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्या देशाचे पारपत्र (व्हिजा) प्राप्त करण्याची जबाबदारी संबधीत विद्यार्थ्याची राहिल. यासाठी राज्य अथवा केंद्रशासनाचे अर्थसहाय्य मंजुर होणार नाही.

२०. ज्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेणार आहे. त्याच अभ्यासक्रमासाठी फी अनुज्ञेय राहिल, इतर कोणत्याही अनुषंगिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश व फी अनुज्ञेय राहणार नाही.

२१. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याने अर्जासोबत चुकिची माहिती अथवा खोटे कागदपत्र सादर केल्याचे आढळून आल्यास अशा विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्ती पोटी शासनाने केलेला संपुर्ण खर्च शेकडा १५ टक्के व्याजासह वसूल करण्यात येईल. तसेच अशा विद्यार्थ्याचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येईल.

२२. परदेशी विद्यापिठामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी GRE(Graduate Record Examination) तसेच TOFEL ( Test of English as a Foreign Language) / IELTS (International English Language Testing System) या प्रवेश परिक्षा घेतल्या जातात. या GRE च्या आधारावर प्रवेश घेणाऱ्याTOFEL/ IELTS उत्तीर्ण असणाऱ्या विदयार्थ्यांचा विशेष विचार करण्यात येईल.

२३. ज्या परदेशी विद्यापीठाचे जागतिक रँकिंग (Latest QS World Raking ) ३०० पर्यंत आहे अशाच विद्यापीठात प्रवेश मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील मात्र निवड मेरिटनुसारच होईल.

२४. विद्यार्थ्यास शिक्षण फी, परीक्षा फी,निर्वाह भत्ता(निवास व भोजन) शैक्षणिक कॉन्टेजन्सी चार्जेस हे लाभ देण्यात येतील.

२५. विमानप्रवास , विजा फी , स्थानिक प्रवास भत्ता, विमा, संगणक, लॅपटॉप व आयपॅड व इतर सुविधांचा खर्च विद्यार्थ्यास स्वतः करावा लागेल.

२८. परदेशातील विद्यापिठामध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे त्या विद्यापीठाचे पत्र व संबधित विद्यापीठाच्या  प्रॉस्पेक्टस ची प्रत द्यावे लागेल.

२९. अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्कासह येणाऱ्या एकुण खर्चाचे संस्थेचे प्रमाणपत्र जोडावे लागेल.

३०. परदेशात ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे त्या अभ्यासक्रमाशी संबधीत असलेल्या शाखेतील /विभागातील दोन विद्येकनिष्ठ / फॅकल्टी यांचे शिफारस पत्र (Reference)शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणेसाठी विहित नमुन्यातील आवेदन पत्र (अर्ज) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक , अपर आयुक्त , आदिवासी विकास,अमरावती,नाशिक,नागपुर, ठाणे यांचे कार्यालयात तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला या कार्यालयात कार्यालयीत वेळेत विनामुल्य उपलब्ध आहे.

शिष्यवृत्तीचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी कार्यालयातून विहित नमुन्यात शिष्यवृत्तीसाठी नमुना अर्ज प्राप्त करून परिपुर्ण माहिती भरून व त्यासोबत आवश्यक कागदपत्र प्रमाणित प्रतींसह जोडलेला अर्ज अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालयात बुधवार दि.३० जून पर्यंत सादर करावा. त्यानंतर सादर करण्यात आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ