निर्माणाधिन रस्त्यांच्या कामांचा आढावा :कामे अपूर्ण राहिल्याने निर्माण झालेल्या प्रदूषण स्थितीबाबत अहवाल सादर करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

 


            अकोला,दि.३ (जिमाका)- जिल्ह्यात रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. त्यात अकोला शहर ते जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. ही कामे पावसाळ्याच्या आत पूर्ण  करणे आवश्यक आहे. तथापि, किमान पावसाळ्यात वाहतुकीसाठी हे रस्ते सुरक्षित असायला हवेत याची दक्षता घ्या.  तसेच रस्त्याची कामे अपूर्ण राहिल्याने निर्माण झालेल्या प्रदूषण स्थितीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अहवाल प्राप्त करुन सादर करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात  पालकमंत्री ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली निर्माणाधिन रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आ. नितीन देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता , कार्यकारी अभियंता,  मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना,  जागतिक बॅंक प्रकल्प इ. विविध संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी पावसाळ्याच्या पार्श्वभुमिवर रस्ते दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याबाबत  आढावा घेण्यात आला.  रहदारीला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही या पद्धतीने व्यवस्था करावी. पावसाळ्यात नागरिकांचे हाल होऊ देऊ नका. अपूर्ण कामे कधीपर्यंत पूर्ण होतील याबाबत कालमर्यादेसह अहवाल सादर करा आणि त्या कालमर्यादेचे पालन न करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध कारवाई करा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले. रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवा.  रस्त्याची कामे अपूर्ण असल्याने त्याचा वातावरणावरील प्रदूषणाचा परिणाम तपासण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून येत्या १५ दिवसांत अहवाल मागवा, असे निर्देशही ना. कडू यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना