पालकमंत्र्यांच्या प्रत्यक्ष भेटीने भारावले शहीदांचे कुटुंबीय; जाणून घेतले मनोगत






अकोला,दि.२७(जिमाका)- देशाच्या रक्षणासाठी सिमेवर प्राणांचे बलिदान केलेल्या शहीदांना मानाचे वंदन करुन त्यांच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे थेट त्यांच्या घरी पोहोचले. त्यांच्या कुटूंबियांचे मनोगत जाणून घेतले. शहीदांच्या कुटुंबियांनी मांडलेल्या व्यथा, अडचणी जाणून त्या सोडविण्याबाबत त्यांना आश्वस्त केले.

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी गेल्या दोन दिवसांत शहीदांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

सोमवार दि.२५ रोजी  सायंकाळी ना. कडू यांनी देशमुख फैल अकोला येथील  शहीद जवान सुरेश शालीग्राम डांगटे यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेतल्या. शहीद सुरेश डांगटे हे  भारत चीन युद्धात दि.११ ऑक्टोबर १९६२ रोजी शहीद झाले होते. त्यानंतर त्यांनी शहीद महादेव नामदेव तायडे, रा.डोंगरगाव ता.अकोला यांच्या कुटुंबियांस भेट दिली.  शहीद महादेव नामदेव तायडे यांना  भारत पाक युद्धात  दि.११ सप्टेंबर १९६५ रोजी  वीरमरण आले होते.

मंगळवार दि.२६ रोजी दुपारनंतर ना. कडू यांनी  कुरणखेड ता. अकोला येथे शहीद जवान  विनोद मोहोड यांच्या स्मारकाला भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला व घरी जाऊन  कुटुंबियांशी संवाद साधला. शहीद विनोद मोहोड हे  दि.५ एप्रिल २००५ मध्ये शहीद झाले होते. त्यांच्या गावात त्यांचे स्मारकाच्या जागी व्यायाम शाळा व वाचनालय सुरु करण्याबाबत ग्रामस्थांनी मागणी केली.

त्यानंतर माना ता. मुर्तिजापूर येथे शहीद जवान संजू सुरेश खंडारे यांच्या कुटुंबियासही ना. कडू यांनी  भेट दिली. शहीद संजू खंडारे हे  दि.२६ जानेवारी २०१७ रोजी शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी पालकमंत्र्यांनी समजावून घेतल्या. त्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर  जामठी बु. ता. मुर्तिजापूर येथे  शहीद जवान विजय बापुराव तायडे यांच्या कुटुंबियास भेट त्यांनी भेट दिली. शहीद विजय तायडे हे दि.२४ जुलै १९९८ रोजी वीरगतीस प्राप्त झाले होते. जामठी बु. गावातील त्यांच्या स्मारकाचे सुशोभिकरण करावे, तसेच महामार्गाजवळ गावाकडे येणाऱ्या रस्त्यास कमान उभारुन त्यास नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली. मधापुरी ता. मुर्तिजापूर येथे शहीद जवान  प्रल्हाद भोलाजी साव यांच्या कुटुंबियासही त्यांनी यानंतर भेट दिली. शहीद प्रल्हाद साव हे  दि.४ डिसेंबर १९७१ च्या  भारत पाक युद्धात वीर गतीस प्राप्त झाले होते. त्यांच्या कुटुंबियांच्या शेतजमिनीच्या पाणंद रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा असे निर्देश ना. कडू यांनी संबंधित तहसिलदारांना दिले.

शहीदांच्या कुटुंबियांच्या प्रति शासनाची असलेली संवेदनशीलता  पालकमंत्र्यांच्या या उपक्रमातून दिसून येत असून शहीदांच्या कुटुंबियांनाही त्याबद्दल आस्था असल्याचे  त्यांनी बोलून दाखवले. या सर्व शहीदांची वीरगाथा ही समाजासमोर यावी, शहीदांच्या कुटुंबियांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ना. कडू यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ