‘अंडी,चिकन खाऊ चला!’ अकोल्यातून कृतिशील जनजागृती

 



अकोला,दि.१९(जिमाका)- बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाबाबत जनमानस शंकाग्रस्त असतांना, लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष चिकन व अंडी खाऊन कृतिशील जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच पत्रकार व समाजातील विविध घटकांतून लोक सहभागी झाले.

येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या वतीने या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार,  पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. तुषार बावने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने, अमोल पाटील व राजरत्न वानखडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद थोरात यांनी केले. बर्ड फ्ल्यू मुळे जनमानसात निर्माण झालेली भिती पाहता चिकन व अंडी  यांचे सेवन करण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र शिजवून खालेल्ल्या मांसातून हा आजार होत नाही. इतकेच नव्हे तर हा फक्त पक्षांना होणारा आजार आहे, तो माणसांना झाल्याची एकही नोंद भारतात नाही. अपसमज दूर करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बावने म्हणाले की,  व्यावसायिक पद्धतीने होत असलेल्या कुक्कुट पालनात पक्षी ठेवण्याच्या जागांचे वारंवार निर्जंतुकीकरण केले जात असते, परिसराची स्वच्छता राखली जाते. त्यांचा अन्य पक्षांशी संपर्क येत नाही. तेव्हा अंडी व चिकन खाणे हे सुरक्षित आहे.

डॉ. भिकाने यांनी सांगितले की, स्थलांतरीत पक्षी असे विषाणू आणत असतात. या पक्षांशी पाणी, विष्ठा इ. च्या  माध्यमातून संपर्कात येतात त्यांना या विषाणूची लागण होते. मात्र असे कुक्कुट पालन केलेले पक्षी हे कोणाच्याही संपर्कात येत नसतात. त्यामुळे त्यांचे मांस व अंडी खाणे हे निर्धोक आहे. परसबागेत कोंबडी पालन करणाऱ्या पक्षीपालकांनी आपल्या पक्षांची अधिक निगा राखावी,असे त्यांनी सांगितले.

उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी सांगितले की,  चिकन व अंडी हे प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहेत. शरिराची रोग प्रतिकार शक्ती ही त्यामुळे वाढत असते. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कृषि प्रधान असून कुक्कुट पालन व दुग्धव्यवसाय हे  त्याला पूरक व्यवसाय आहेत. निव्वळ गैरसमजापोटी या व्यवसायांवर अरिष्ट येणे हे योग्य नाही. तेव्हा हा गैरसमज दूर करण्यासाठी आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की,  बर्ड फ्ल्यू या पक्षांमध्ये होणाऱ्या आजाराबाबत माणसांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आयोजित हा कृतिशिल प्रबोधनाचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. लोकांनी न घाबरता चिकन व अंडी खावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.  प्रवीण बनकर यांनी केले तर डॉ. मंगेश वड्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी चिकन व अंडी यांच्या डिशचा आस्वाद घेऊन  चिकन व अंडी खाने सुरक्षित असल्याचा संदेश दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ