रस्ते सुरक्षा अभियान २०२१:रस्ते सुरक्षेची सवय ही ‘स्वयंप्रेरणा’व्हावी- विनोद जिचकार

 





  अकोला,दि. (जिमाका)- रस्त्यावर बाळगावयाची सुरक्षा ही सप्ताहापुरती बाब नाही. रस्त्यावर घ्यावयाची खबरदारी ह्या स्वयंप्रेरणेने आयुष्यभरासाठी अंगी बाणावयाची सवय असायला हवी,असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी आज येथे केले.

३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला यांच्यातर्फे वाहन चाचणी मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार,  मोटार वाहन निरीक्षक कदम तसेच अन्य अधिकारी कर्मचारी व शिकाऊ अनुज्ञप्तीधारक, वाहन चालक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार यांनी केले. रस्ते सुरक्षा अभियानाचे आयोजनामागील भुमिका त्यांनी  स्पष्ट केली.

यावेळी डॉ. दुसाने यांनी रस्ते सुरक्षा ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. आपण दैनंदिन जीवनात वाहन चालवितांना  अनेक प्रकारे निष्काळजीपणा करुन स्वतःचा व अन्य व्यक्तिंचा जीव धोक्यात घालत असतो, हे अत्यंत धोकेदायक असून अपघातातील अकस्मात मृत्यूंमुळे कुटुंब व समाजावरही परिणाम होत असतात,असे त्यांनी सांगितले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात विनोद जिचकार म्हणाले की, रस्ते सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक असते, त्यातही डोक्याला मार लागुन होणाऱ्या मृत्युंची संख्या जास्त असते. त्यामुळे हेल्मेटचा वापर हा अत्यंत आवश्यक आहे.  अशाप्रकारे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा ही स्वयंप्रेरणेने पाळावयाची बाब आहे,असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  अभिजीत गावंडे यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ