महा कृषीऊर्जा अभियान कृषी पंप वीज जोडणी धोरणाचा लाभ घेण्यात जिल्हा अग्रेसर राहील- ना. कडू

 




अकोला,दि.२७ (जिमाका)- महाराष्ट्र शासन 'कृषी पंप वीज जोडणी धोरण- २०२०'अंतर्गत नविन कृषी पंप वीज जोडणी व वसूल झालेल्या वीजबिलापैकी ६६ टक्क्याचा लाभ जिल्ह्याच्या वीज विकासासाठी करून घेण्यात अकोला जिल्हा अग्रेसर  राहील,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

         विद्युत भवन अकोला येथे आयोजित महा कृषी ऊर्जा अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला महावितरण अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये,अधिक्षक  अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह शेतकरी बांधव व कर्मचारीवृंद उपस्थित होते. यावेळी या अभियानाअंतर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना सौर कृषी पंप योजनेचे कोटेशन वाटप करण्यात आले.

             यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की,ऊर्जा खाते हे दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे खाते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा करतांना तो नियोजनबद्ध व शेतकऱ्यांच्या हिताचा असावा. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडेही महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे. शेतकऱ्यांसाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी  जे-जे चांगले आहे त्यांच्या पाठीशी पालकमंत्री म्हणून खंबीरपणे उभे असल्याचे यावेळी ते म्हणाले.

                  शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत महाराष्ट्र शासन व महावितरण कंपनिच्यावतीने महा कृषी ऊर्जा अभियानाअंतर्गत दरवर्षी एक लाख याप्रमाणे सौरकृषी पंप देण्याचे धोरण आहे. या धोरणाचा प्रारंभ मंगळवारी (दि.२६) करण्यात आला आहे. याच अभियानाअंतर्गत शेतकरी प्रकाश तायडे चिखलगाव, सुधाकर वाहूरवाघ (साहित-अकोला), शंकर पालवे(पोपटखेड), योगेश केसळे (मुर्तीजापुर) आणि मदन पांडे (निंभी बार्शिटाकळी) अशा पाच शेतकऱ्यांना सौर कृषी पंप कोटेशनचे वाटप करण्यात आले.

            याचबरोबर शासनाच्या वतीने 'कृषी पंप वीज जोडणी धोरण - २०२०' राबविण्यात येत असून या धोरणात अनाधिकृत वीज जोडण्या अधिकृत करणे, तात्काळ नविन वीज जोडणी देणे,तसेच कृषीपंपाच्या थकबाकीवर 67 टक्क्यापर्यंत माफी देऊन वसूल झालेल्या वीज बिलाच्या ६६ टक्के रक्कम ही त्या जिल्ह्याची वीज यंत्रणा सक्षमीकरणाकरीता वापरण्यात येणार आहे.  कार्यक्रमाचे सुत्र संचालन अशोक पेठकर यांनी केले.

एस.पी. केनेकर यांचा पालक मंत्र्याच्या हस्ते सन्मान

     अकोला तालुक्यातील  (पांढरी खरप) येथील  अंध शेतकरी, केशराव भिमराव गायकवाड यांना वीज जोडणी देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल अकोला ग्रामीण उप विभागाचे उप कार्यकारी अभियंता एस.पी.केनेकर  यांना पालकमंत्री ना. कडू यांनी सन्मान केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ