राष्ट्रीय मतदार दिवस: लोकशाही निकोप राखण्याची जबाबदारी साऱ्यांचीच- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे प्रतिपादन

 






अकोला,दि.२५ (जिमाका)-लोकशाही निकोप व प्रभावी राखण्यासाठी मतदारांनी अधिकाधिक जागरुक असले पाहिजे. मतदार यादीतील आपले नाव, फोटो इ. बाबी तपासून खातरजमा करावी. जेणे करुन मतदानापासून कुणीही वंचित राहता कामा नये. यासाठी मतदार, निवडणूक प्रक्रिया राबविणारे अधिकारी कर्मचारी , राजकीय पक्ष व अन्य  सर्वच घटकांची  ही जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

येथील लोकशाही सभागृहात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, ब्रॅण्ड ॲम्बेसेडर जयश्री पाटील तसेच सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, नवमतदार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, निवडणूक यंत्रणांनी मतदार यादी ही अधिक  अद्यावत ठेवणे गरजेचे आहे. आवश्यक नावे समाविष्ट करणे, स्थलांतरीत वा अन्य कारणांमुळे मतदारांची नावे वगळणे, रहिवास बदलल्यास भाग बदलणे अशा अन्य कारणांमुळे मतदार यादी अद्यावत करणे आवश्यक असते. त्यामुळे मतदारांना मतदान करणे अधिक सुलभ होते व त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येतो. मतदार यादी जितकी अधिक परिपूर्ण तितके मतदान अधिक होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार यांनीही या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन नवमतदारांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वांनी मतदान करण्याबाबतची सामुहिक  प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप जिल्हाधिकारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पथनाट्य कलावंत सर्जेराव देशमुख यांनी  जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले.  सुत्रसंचालन निलेश गाडगे व सतिष काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  गजानन महल्ले, वैजनाथ कोरकणे, स्वप्निल ओळंबे, उमेश वैद्य, मधुकर मानकर आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ