‘माविमं’चे पुढचे पाऊल ‘ऑनलाईन’चे- अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे

 









अकोला,दि.२१ (जिमाका)- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविमं) ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविणारी शिखर संस्था आहे. आतापर्यंत विविध क्षेत्रात दमदार आर्थिक कामगिरी केल्यानंतर माविमंने आता ई- बिझीनेस प्लॅटफॉर्म तयार केला. त्याच्या यशस्वी चाचणीनंतर आता  लवकरच माविमं आपल्या बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाईन ॲप आणणार असल्याचे माविमंच्या अध्यक्ष श्रीमती ज्योतीताई ठाकरे यांनी सांगितले.

माविमंच्या  अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांच्या अकोला जिल्हा दौऱ्यानिमित्त आज येथील लोकसंचालित साधन केंद्र अकोला तर्फे  विविध वस्तू विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित महिलांच्या मेळाव्यात श्रीमती ठाकरे मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार,  जिल्हा अग्रणी बॅंकेचे  व्यवस्थापक आलोक तेरानिया,  स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने, नाबार्डचे उपविभागीय व्यवस्थापक वाकडे,  केशव पवार, संजय राजड,  जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे आदी उपस्थित होते.

 कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर  डाबकीरोड मेतकर संकुल समोर असलेल्या विविध वस्तू विक्री केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विक्री केंद्रातील उत्पादने व वस्तूंबाबत श्रीमती ठाकरे यांनी माहिती जाणून घेतली.  त्यानंतर बोलतांना श्रीमती ठाकरे म्हणाल्या की,  कोणताही भेदभाव न पाळता महिला या एकत्र येऊ शकतात.  त्यातून महिलांच्या संघटनाद्वारे माविमंने संघटीत शक्ती निर्माण केली आहे.  माविमंच्या महिला या संघटीतपणे दर्जेदार उत्पादने निर्माण करुन स्वतःच्या मालासाठी बाजारपेठ मिळवू शकतात. हे करतांना त्या सामाजिक  बांधिलकीही जपतात. कोरोनाच्या संकट काळात त्यांनी अनेक ठिकाणी मास्क तयार करुन ते समाजात वाटले. प्रत्येक महिलेने एक रुपया या प्रमाणे रक्कम जमा करुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख ३५ हजार रुपये इतकी मदत जमा केली. प्लास्टीक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी कापडी पिशवी निर्माण केल्या.  अशाप्रकारे महिला ह्या पर्यावरणाच्या रक्षणाचीही जबाबदारी पार पाडत आहेत. आतापर्यंत संपूर्ण राज्यात माविमंने विविध बॅंकांशी संलग्नता साधून महिलांना चार हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून दिले.  या कर्जफेडीचा परतावा दर हा तब्बल ९९.५० टक्के इतका आहे.  हा विश्वास माविमंच्या महिलांनी संपादन केला आहे. खुल्या बाजारात स्पर्धा करण्यासाठीमाविमंने इ- बिझीनेस प्लॅटफॉर्म तयार केला.  आता येत्या ८ मार्च पर्यंत ऑनलाईन ॲप बाजारात आणून त्याद्वारे माविमंच्या महिलांनी उत्पादित केलेली विविध उत्पादने विक्री करण्याची सज्जता आहे,असे त्यांनी सांगितले.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना निचडे यांनी केले तर आभार प्रदर्शन  सोनाली अंबरते यांनी केले. या कार्यक्रमात अनेक महिला , स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ