महसूल सप्ताहाचा जिल्हाधिकारी कार्यालयात श्रमदानाने शुभारंभ



महसूल सप्ताहाचा जिल्हाधिकारी कार्यालयात श्रमदानाने शुभारंभ

अकोला, दि. 1 : जिल्ह्यात महसूल सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी श्रमदानाद्वारे करण्यात आला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी श्रमदानात सहभागी होऊन परिसरात स्वच्छताकार्य केले. 

महसूल विभागामार्फत आजपासून 7 ऑगस्टपर्यंत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. सप्ताहाची सुरूवात श्रमदानातून व्हावी, या जिल्हाधिका-यांच्या आवाहनानुसार आज अनेक अधिकारी व कर्मचारी श्रमकार्यात सहभागी झाले होते. अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवान, जिल्हा पुरवठा अधिकारी बबन काळे, अनिल चिंचोले यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनीही स्वत: फावडे हाती घेऊन कार्यालयाच्या परिसरातील गवत काढले व परिसर झाडून काढला. इतर अधिकारी व कर्मचा-यांनीही उत्साहाने श्रमकार्यात योगदान दिले. सफाईकार्यातून हटवलेला कचरा महापालिकेच्या वाहनाद्वारे वाहून नेण्यात आला.

 

कोणतेही काम पूर्णत्वास जाण्यासाठी सांघिक समन्वय आवश्यक असतो. महसूल सप्ताहात  अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे. नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप आदी विविध कामे करण्यात येतील. अधिकारी व कर्मचा-यांनी अधिकाधिक काम समन्वयाने पूर्ण करून हा सप्ताह यशस्वी करावा. सप्ताहातील उपक्रमांबाबत जनजागृती करून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी व त्यांना आवश्यक सेवा मिळवून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले.

 

सप्ताहात ई- हक्क पोर्टलबाबतची कार्यवाही, महसूल नोंदी दुरुस्ती, गाव तिथे स्मशानभूमी सुविधा निर्माण करण्यासाठी मोहिम, दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप, सैनिकांना प्रमाणपत्र वाटप आदी कार्यक्रम राबविण्यात येतील. सलोखा योजनेत गावागावांतील व शेतातील रस्त्यांबाबत तलाठी, मंडळ अधिकारी स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्यासाठी तलाठी कार्यालयांमार्फत शिबीरांचे आयोजन करण्यात येईल.

 ०००




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ