दिव्यांगजनांसाठी ऑक्टोबरमध्ये जिल्हास्तरीय शिबिर

शासन आपल्या दारी
दिव्यांगजनांसाठी ऑक्टोबरमध्ये जिल्हास्तरीय शिबिर शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगांना आवश्यक दाखल्यांचे वितरण - जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 30 : दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी दि. 3 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय शिबिर आयोजित केले जाईल. एकाच छताखाली सर्व विभागांशी संबंधित योजना व कागदपत्रांचा लाभ दिव्यांग बांधवांना मिळवून देणे शक्य होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व विभागांनी नियोजन व सर्वदूर जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग कल्याण विभागाच्या कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. जिल्हा समाजकल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, दैनंदिन जीवनात दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळविण्यासाठीही त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ उपक्रमात जिल्हास्तरीय शिबिर घेण्यात येईल. या एकदिवशीय शिबिरात दिव्यांग बांधवांना एकाच ठिकाणी विविध विभागांशी संबंधित दाखले, कागदपत्रे मिळण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी मदत होणार आहे. महसूल, कृषी, समाजकल्याण, महिला व बालविकास, आरोग्य विभाग आदी सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आदी यंत्रणांचा शिबिरात सहभाग असेल. त्यादृष्टीने तयारी करावी. शिबिराबाबत प्रत्येक तालुक्यात भरीव जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात सुमारे 45 हजार 906 दिव्यांग बांधव आहेत. शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या अडचणी जाणून घेऊन त्याच दिवशी निपटारा करण्यात येईल. दिव्यांग बांधवांसाठी युडीआयडी प्रमाणपत्र, शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, शिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे आदी शिबिरात संबंधित विभागांच्या कक्षांतून उपलब्ध करून देण्यात येतील, असे श्री. पुंड यांनी यावेळी सांगितले. ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ