‘हर घर तिरंगा’मोहिमेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद स्वातंत्र्यदिनाचा मुख्य समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात

अकोला, दि. 14 : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 वा वर्धापनदिन उद्या संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सांगतेनिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ ही मोहिम सर्वदूर राबविण्यात येत असून, जिल्ह्यात गावोगाव अनेक कार्यक्रम होत आहेत.

 क्रांतिदिनी ‘पंचप्रण शपथ’ कार्यक्रमात मोहिमेची उत्साहात सुरूवात झाली. गावोगाव त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्यसैनिक आणि शूरवीरांचा सन्मान म्हणून 535 गावांमध्ये शिलाफलक उभारण्यात आले आहेत. देशी जातीच्या 75 वृक्षांची लागवड करून अमृत वाटिका विकसित करण्यात आल्या आहेत.

 देशाच्या तेजस्वी इतिहासाचे स्मरण करून मातृभूमीविषयी प्रेम व अभिमान येथील मनामनात जागविण्यासाठी  ‘मिट्टी को नमन, वीरोंको वंदन’, वसुधा वंदन असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. गतवर्षीप्रमाणेच यंदाही दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ मोहिम सुरू असून,  गावोगाव हजारो नागरिक या मोहिमेत सहभागी झाले आहेत.  

स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मंगळवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण होईल. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहतील.    ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात येणार असल्यामुळे सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत इतर कोणताही शासकीय, निमशासकीय समारंभ आयोजित करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विविध शासकीय, निमशासकीय, अशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, प्राधिकरणे, संस्थांनी ध्वजारोहण करताना भारतीय ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करावे. अनेकदा प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केला जातो. अशा वापरावर ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार बंदी आहे. असा वापर कुणी केल्याचे आढळल्यास वापरकर्ता, उत्पादक, वितरक व मुद्रकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिका-यांनी दिला आहे.  

                 000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ