राष्ट्रीय पशुधन अभियानात विविध बाबींसाठी अनुदान

 राष्ट्रीय पशुधन अभियानात विविध बाबींसाठी अनुदान

अकोला, दि. 21 : पशुसंवर्धन विभागातर्फे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानात कुक्कुटपालन, शेळी मेंढी युनिट, वराहपालन, वैरणनिर्मिती आदी बाबींच्या प्रकल्पांसाठी अनुदान देण्यात असून पशुपालक व शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जगदीश बुकतारे यांनी केले आहे.  

रोजगारनिर्मिती व उद्योजकता विकासासाठी पशुधनाची उत्पादकता, दूध, लोकर, अंडी, मांस, वैरणीची उपलब्धता वाढविणे, पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा असा राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या सुधारित योजनेचा उद्देश आहे. असंघटित क्षेत्रातील उत्पादनांची विक्री व्हावी व त्यांना चांगला कच्चा माल मिळावा यासाठी संघटित क्षेत्राशी जोडण्यात येणार आहे. अभियानात कुक्कुट, शेळी, मेंढी व वराह प्रजाती विकास, तसेच पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास याअंतर्गत अर्ज करता येईल.

त्यात अंडी उत्पादनासाठी 1 हजारपेक्षा अधिक कुक्कुट संगोपन प्रकल्पासाठी 25 लक्ष अनुदान उपलब्ध आहे. शेळी- मेंढी युनिटसाठी 100 मादी व 5 नर ते 500 माजी व 25 नर यानुसार 10 ते 50 लक्ष रू. अनुदान उपलब्ध आहे. वराहपालन युनिटसाठी 50 मादी व 5 नर ते 100 मादी व 10 नर याप्रमाणे 15 ते 30 लाख रू. अनुदान उपलब्ध आहे. पशुखाद्य व वैरण, मूरघासबेल, वैरणीच्या विटा, टीएमआर निर्मिती प्रकल्पाला 50 लक्ष रू. अनुदान मिळते.  

अर्जाची पद्धती

इच्छूकांनी www.nlm.udyamimitra.in  या पोर्टलवर अर्ज करावा. विभागाकडून हा अर्ज तपासून बँकेकडे मंजुरीसाठी सादर केला जाईल. बँकेने कर्जपुरवठ्याची हमी दिल्यावर राज्य समितीच्या शिफारसीसह केंद्र शासनाकडे पाठविला जाईल. अर्जदार किंवा त्यांच्याकडील तज्ज्ञ प्रकल्पाशी संबंधित प्रशिक्षित, तसेच अनुभव आवश्यक. स्वत:ची किंवा भाडेतत्वावरील जमीन आवश्यक आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ