‘मेरा माटी, मेरा देश’ उपक्रमाच्या तयारीला प्रशासनाकडून वेग

 



‘मेरा माटी, मेरा देश’ उपक्रमाच्या तयारीला प्रशासनाकडून वेग

शिलाफलकांची कामे दि. 12 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश

अकोला, दि. 8 :  ‘मेरा माटी, मेरा देश’ उपक्रमात शूरवीरांना आदरांजली म्हणून गावोगाव शिलाफलक बसविण्यात येणार आहेत. हे काम उत्कृष्ट गुणवत्ता राखून दि. 12 ऑगस्टपूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. 

 स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम दि. 9 ते 15 ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार असून, जिल्हा प्रशासनाकडून तयारीला वेग देण्यात आला आहे. त्याचा आढावा नियोजन सभागृहात घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत योगदान देणा-या स्वातंत्र्यसैनिक, हुत्मात्मे, तसेच देशाच्या संरक्षणासाठी लढणा-या विविध दलांतील शहिद, वीरांची नावे असलेला शिलाफलक गावोगाव उभारण्यात येईल. शिलाफलकांची ठिकाणे निश्चित झाली असून, जवळजवळ पावणेपाचशे ठिकाणी कामही सुरू आहे. अमृत वाटिकांच्या कामांनाही सुरूवात झाली आहे. सर्व नियोजित स्थळी दि. 12 ऑगस्टपूर्वी हे काम पूर्ण करावे. शिलाफलकाचे महत्व लक्षात घेऊन गुणवत्ता राखावी. उपक्रम सर्वदूर पोहोचविण्यासाठी विविध विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रयत्न करावेत. ‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम’चा वापर करावा. शाळा- महाविद्यालयांच्या प्रभातफेरी आयोजित कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. 

त्याचप्रमाणे, उद्या (दि. 9 ऑगस्ट) विविध ठिकाणी ‘पंचप्राण शपथ’ कार्यक्रमात मूठभर माती हाती घेऊन राष्ट्रीय एकता, देशाभिमान व देशाला विकसित करण्याबाबत शपथ घेतली जाणार आहे. त्यानंतर विविध तालुक्यांतून माती गोळा करून जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र केली जाणार आहे. ही माती ‘कलश यात्रे’द्वारे नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून दिल्ली येथे पाठवली जाईल. उपक्रमात मिट्टी का नमन, वसुधा वंदन आणि वीरों को वंदन याबरोबरच ‘हर घर तिरंगा’ अभियान दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान आयोजित केले जाणार आहे. त्यासाठी आजमितीला जिल्ह्यात सुमारे 3 लाख राष्ट्रध्वज उपलब्ध असून, आवश्यकतेनुसार राष्ट्रध्वज उपलब्ध करून घ्यावेत, असेही निर्देश त्यांनी दिले. 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ