‘एक्सोर्ट आऊटरिच’ कार्यक्रमात निर्यातीबाबत मार्गदर्शन





शासन आपल्या दारी; ‘एक्सोर्ट आऊटरिच’ कार्यक्रमात निर्यातीबाबत मार्गदर्शन

अकोला जिल्हा ‘एक्स्पोर्ट हब’ होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार 

अकोला, दि. 3 : जिल्ह्यात डाळ, सोया उत्पादनांसह विविध कृषी व इतर वस्तूंचे उत्पादन पाहता निर्यात विकासाच्या मोठ्या शक्यता आहेत. त्यानुसार अकोला जिल्हा हे ‘एक्स्पोर्ट हब’ होण्यासाठी विविध विभाग, उद्योजक, कृषी उत्पादक कंपन्या, व्यापारी बांधवांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.  

जिल्ह्यातील निर्यातीस वाव व प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहकार्याने जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘एक्स्पोर्ट आऊटरिच’ कार्यशाळा नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. विदेश व्यापार महासंचालनालयाचे प्रतिक गजभिये, मुख्य पोस्ट अधिक्षक बी. व्ही. चव्हाण, बँक ऑफ महाराष्ट्रचे भगवान सुरशे, राजन ठवकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संतोष बनसोड, ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन’चे अक्षय शाह, वस्तू व सेवा कर कार्यालयाचे ए. पी. अवचार, सहायक कौशल्य विकास आयुक्त द. ल. ठाकरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, निशांत पट्टेबहादूर आदी उपस्थित होते.

प्रत्येक जिल्हा निर्यात केंद्र करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातून कृषी व इतरही उत्पादनांची निर्यात वाढावी यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांकडून अनेकविध सुविधा देण्यात येत आहेत. त्यांचा लाभ घेऊन जिल्ह्यातून अधिकाधिक उत्पादने निर्यात होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन श्री. कुंभार यांनी केले.

जिल्ह्यात डाक निर्यात केंद्र सुरू करण्यात आले असून, पॅकेजिंगपासून सर्व सुविधा उपलब्ध आहेत. येथील सुविधेसाठी केवायसी, कस्टम हाऊस एजंटची गरज नाही. नोंदणी सोपी असून, मोठ्या निर्यातीला दरात सवलत दिली जाते. पोर्टलला ट्रॅकिंगची सोय आहे. अमेरिका, जपान, कॅनडा, ब्रिटन आदी सर्व देशांत उत्पादने पाठवता येतात, असे टपाल कार्यालयाचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’कडून निर्यातदारांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती श्री. सुरशे यांनी दिली.
जिल्ह्यात उद्योग-व्यवसायांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभाग कटिबद्ध असून, जिल्ह्यातील 1 लाख 20 हजार उमेदवारांचा डेटाबेस उपलब्ध आहे. उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळाची गरज तपासून त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

‘अपेडा’मार्फत राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती श्री. किरवे यांनी दिली. श्री. शाह यांनी ‘इंडियन ट्रेड पोर्टल’ व ‘इंडियन बिझनेस पोर्टल’ची माहिती दिली. यावेळी तज्ज्ञांनी आयईसी कस्टम प्रक्रिया, एमएसएमई योजना, निर्यात कशी करावी, बायर-सेलर मीट, इपीसीची भूमिका, वित्तीय साह्य मिळविण्याचे पर्याय ई-कॉमर्स आदींबाबत मार्गदर्शन केले.  अनेक उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, उद्यमशील युवक-युवती, कार्यरत निर्यातदार आदी उपस्थित होते.

०००

 

 

 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ