कावड यात्रेबाबत प्रशासन व मंडळांच्या प्रतिनिधींत चर्चा 

कावड यात्रा शांततेत पार पडण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे

              - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

अकोला, दि. 14 : सण-उत्सव हे संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत. कावड यात्रेसाठी भाविकांना आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाकडून देण्यात येतील. उत्सव शांततेत पार पडावा यासाठी आवश्यक शिस्तीचे पालन करून मंडळांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

कावड यात्रा नियोजनाबाबत विविध कावड मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी  व मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, कावड यात्रेत भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल. पथदिवे, ठिकठिकाणी पेयजल, स्वच्छतागृहे, रूग्णवाहिकेसह वैद्यकीय पथके आदी सुविधा निर्माण केल्या जातील. बसच्या व्यवस्थेबाबत एस. टी. महामंडळाला सूचना देण्यात येईल. कावड यात्रेला 75 वर्षांची परंपरा आहे. यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये. यासाठी मंडळांनी सहकार्य करावे. भाविकांनी सहभागी होण्यापूर्वी आरोग्य तपासणी करून घ्यावी. नदीचे स्वरूप, प्रवाह पाहता लहान मुलांना तिथे आणू नये. घाटाजवळ आवश्यक बोट, आपत्ती व्यवस्थापन पथक आदी सुविधा दिल्या जातील.

मार्गातील निर्माणाधीन टोलनाक्यामुळे यात्रेला मार्गक्रमणात अडथळा येऊ शकतो, अशी बाब प्रतिनिधींनी सभेत मांडली. त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाशी चर्चा करून निश्चित तोडगा काढण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.   

 पोलीस अधिक्षक श्री. घुगे म्हणाले की, मंडळांनी नियमांचे पालन करावे. यात्रेत चालताना स्पर्धा करू नये. डीजेला पूर्णत: बंदी आहे. ध्वनीमर्यादा राखून ध्वनीक्षेपक वापरता येतील. मद्यपान किंवा अंमली पदार्थ, विनापरवाना शस्त्र बाळगणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल. पोलीसांकडून चेक पोस्टवर तपासणी केली जाईल. रस्त्यात ट्रक पार्किंग होणार नाही याची दक्षता घेऊ. यात्रेत प्रशासनासोबत समन्वयासाठी मंडळाने स्वयंसेवक नेमून त्यांची यादी प्रशासनाला द्यावी. घाटाच्या स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यासाठी मंडळांच्या स्वयंसेवकांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

०००    

 



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ