कावड यात्रा मार्गावर भाविकांच्या सुविधांसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार




 कावड यात्रा मार्गावर भाविकांच्या सुविधांसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवा

- जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

अकोला, दि. 8 : श्री राजराजेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी जलाभिषेकासाठी येणाऱ्या कावड यात्रेच्या मार्गावर भाविकांच्या सुविधेसाठी रस्ते, पथदिव्यांच्या दुरूस्तीसह पेयजल सुविधा, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आदी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

कावड यात्रा नियोजनाबाबत आज जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अति. पोलीस अधिक्षक अभय डोंगरे. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, कावड यात्रेच्या रस्त्यांची पाहणी करून आवश्यक तिथे दुरुस्त्या कराव्यात. महत्वाच्या पॉईंटवर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. महापालिकेकडून मोबाईल स्वच्छतागृहांची व्यवस्था व्हावी. ठिकठिकाणी पेयजलाची सुविधा ठेवावी. ‘महावितरण’ने वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्व पोल, ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने वीजेच्या तारा पुरेशा उंचीवर आहेत किंवा कसे, हे तपासावे.

गांधीग्राम ते अकोला या मार्गावर  रस्ते दुरुस्ती, पुलाची दुरूस्ती करून आवश्यक बॅरिकेटस् लावावेत. मार्गात कुठेही अतिक्रमण असल्यास ते हटविण्यात यावे. वैद्यकीय पथके, रूग्णवाहिका, औषधसामग्री आदी बाबी सुसज्ज ठेवाव्यात. भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

 जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, बळवंत अरखराव, तहसीलदार सुनील पाटील, सुनील चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता बी. डी. कथलकर, पोलीस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर आदी उपस्थित होते. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ