कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव: कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचना


 कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावकृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचना

               वेळीच उपाययोजना केल्यास नियंत्रण शक्य

-         जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे

 

            अकोला, दि. 27 : जिल्ह्यातील काही भागात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला असून, शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोना कराव्यात, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व त्यांच्या पथकाने बाळापूर तालुक्यात व्याळा, खिरपुरी  येथे प्रक्षेत्र भेट दिली, त्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला. अकोला, अकोट, तेल्हारा तालुक्यातील काही भागातही बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेल्या व सध्या फुले, पात्या व लहान बोंड धारण केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. चिमलेल्या किंवा डोमकळीसदृश्य अवस्थेत असलेल्या प्रत्येक फुलात गुलाबी बोंडअळी आढळून आली. असे फुल अलगदपणे निघून येते.

             अशा कोमेजलेल्या फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीची दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी फुलांमधून कोवळ्या बोंडामध्ये शिरताना आढळून आली आहे. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सद्य:स्थितीत 10 ते 20 टक्के आढळून आला आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या शेतकरी बांधवांनी पिकाचे निरीक्षण करावे. असा प्रादुर्भाव इतरही भागात फुले अवस्थेत असणाऱ्या कपाशी पिकावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे सर्वेक्षण करून वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्या, असे आवाहन श्री. किरवे यांनी केले.

 

            कपाशीचे पिक 50 ते 60 दिवसांचे झालेल्या भागात फूल लागण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत गुलाबी बोंडअळीची मादी उमलत असलेल्या फुलांच्या खालच्या बाजूला एकेरी अंडी घालते. त्यातून सूक्ष्म अळ्या बाहेर येऊन फुलांमध्ये प्रवेश करतात व उमलणाऱ्या पाकळ्या आतून तोंडातील धाग्यांच्या सहाय्याने बंद करून अळी फुलांमध्ये उपजीविका करते. अशी प्रादुर्भावग्रस्त फुले न उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात व ती आपण सहज ओळखू शकतो. अशा फुलांना 'डोमकळी' म्हणतात. त्यात हमखास गुलाबी बोंडअळी आपली उपजीविका करताना दिसते. फुलांच्या आतील भाग अळीने खाल्यामुळे बहुदा फुलांचे रूपांतर बोंडामध्ये होत नाही व ते गळून पडतात व फुलाचे रूपांतर बोंडामध्ये झाल्यास अळी बोंडामध्ये शिरून बोंड पोखरते. त्यामुळे नुकसान होते.

      शेतकरी बांधवांनी खालील उपाययोजना कराव्यात.

१.      नत्र खते व संजीवकांचा शिफारसीप्रमाणे वापर करावा.

२.      गुलाबी बोंडअळीवर पाळत ठेवण्यासाठी पीक उगवणीनंतर 40 ते 45 दिवसानंतर फेरोमन सापळ्यांच्या वापर करावा. यासाठी एकरी दोन किवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे  लावावे सतत दोन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाययोजना करण्यात याव्यात.

३.      पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळीसहित नष्ट कराव्या म्हणजे पुढील प्रादुर्भाव रोखता येईल.

४.      पीक उगवणीनंतर 35 ते 40 दिवसांपासून दर पंधरा दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझेडिरेक्टीन 3000 पीपीएम 40 मिलीप्रति 10 लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

५.      पीक उगवणीनंतर 55 ते 60 दिवसांनी 12 ते 15 दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा ट्रायडियाबॅक्टी  किवा किंवा क्लोरपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली/10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

६.      फुलामध्ये प्रादुर्भाव पाच टक्क्यांपर्यंत आढळून आल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरपायरिफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली/10 लीटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

७.      प्रादुर्भाव 5 ते 10 टक्के प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के 30 मिली किंवा इंडोक्साकार्ब 15.8 टक्के 10 मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

८.      जेथे प्रादुर्भाव 10 टक्क्यांवर आहे अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालीलपैकी कोणत्याही एका मिश्र कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3 टक्के + लॅब्डासायह्लोथ्रीन 4.6 टक्के 5 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के + अॅसीटामीप्रीड 7.7 टक्के 10 मिली.

 

                                            000

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ