‘जल जीवन मिशन’च्या जनजागृतीसाठी लघुपटनिर्मिती स्पर्धा

 ‘जल जीवन मिशन’च्या जनजागृतीसाठी लघुपटनिर्मिती स्पर्धा

अकोला, दि. 8 : ‘जल जीवन मिशन’बाबत जनजागृतीसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धा घेण्यात येत असून, दि. 31 जानेवारी पूर्वी प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन मिशनच्या प्रकल्प संचालक अनिता तेलंग यांनी केले आहे.

            जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल देण्यासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. याबाबत प्रबोधनासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालय व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे लघुपट स्पर्धा होत आहे. त्यात पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ३१ हजार, २१ हजार व ११ हजार रुपये, तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धकांनी लघुपटाची निर्मिती, पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पार्श्वसंगीत, गीत, चित्रीकरण स्वतः केलेली असावी. पूर्वप्रकाशित किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकीय विभागांनी त्यांच्या कामासाठी तयार केलेले लघुपट स्पर्धेसाठी सादर करू नयेत. कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन होत नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र स्पर्धकास सादर करणे बंधनकारक आहे.

लघुपट निर्मितीसाठी वापरलेले शूटिंग, साहित्य, व्यावसायिक दर्जाचे व उत्तम असावे. लघुपट निर्मितीची भाषा मराठी असावी. त्याद्वारे कोणाच्याही भावना व अस्मिता दुखावणार नाही याची स्पर्धकांनी काळजी घ्यावी.        लघुपट स्पर्धेसाठी एक स्पर्धकाला एकाच विषयावरील लघुपट सादर करता येईल. लघुपट तीन ते पाच मिनिटांचा असावा. पाण्याचे शाश्वत स्रोत, पाणी पुरवठा -देखभाल दुरुस्ती, जलसंवर्धन,  हर घर जल घोषित गाव विकास, जल जीवन मिशन यशोगाथा, विविध योजनांचे कृतीसंगम असे स्पर्धेचे विषय आहेत.

इच्छूकांनी लघुपट पेनड्राईव्हमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, आगरकर विद्यालय परिसर, रेल्वे स्टेशन रोड, अकोला येथे येत्या 31 जानेवारीला सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावे, असे आवाहन श्रीमती तेलंग यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ