‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार



 

शाळांना भरघोस बक्षीसे जिंकण्याची संधी

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा

-          जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. १ : शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि आनंददायी व प्रेरणादायी वातावरण निर्माण व्हावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना सहभागी करून घ्यावे, तसेच अधिकाधिक लोकसहभाग मिळवून हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अभियानाबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, शिक्षणाधिकारी सुचेता पाटकर व सर्व गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

लोकसहभाग मिळवा

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, शाळांतील पायाभूत सोयी सुविधांत वाढ, शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती, तसेच आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांबाबत उपक्रमांसाठी शाळांना प्रोत्साहित करण्यासाठी हे अभियान  राबविण्यात येत आहे.  या अभियानात सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळा सहभागी असतील. मुंबई महापालिका, वर्ग-अ आणि वर्ग-ब महानगरपालिका शाळा, उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर हे अभियान राबविण्यात असून, जिल्ह्यातील सर्व शाळांना अभियानात सहभागी करून घ्यावे.

शिक्षणाबाबत आनंददायी व प्रेरणादायी वातावरण निर्मितीसाठी, तसेच शाळांचे सौंदर्यीकरण, स्वच्छता, गुणवत्ता वाढविण्यासाठी हे अभियान महत्वपूर्ण आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था, विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक आदी लोकसहभाग मिळवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.

भरघोस बक्षीसे

या अभियानातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन मिळणार आहे. अभियानात विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम यासाठी एकूण १०० गुण असतील. मुंबई महापालिका क्षेत्रातील तसेच अ व ब वर्ग पालिका क्षेत्रातील शाळांना पहिले पारितोषिक २१ लाख, दुसरे पारितोषिक ११ लाख, तिसरे पारितोषिक सात लाख रू. आहे.

त्याचप्रमाणे, उर्वरित महाराष्ट्रामधील शाळांनादेखील विभागस्तरावर २१ लाख, ११ लाख व ७ लाख अशी तीन बक्षीसे, जिल्हास्तरावर ११ लाख, ५ लाख व ३ लाख, त्याचप्रमाणे तालुका स्तरावर ३, २ व १ लाख रू. अशी तीन बक्षीसे मिळतील. राज्यस्तरावर तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळासाठी पहिले पारितोषिक ५१ लाखांचे असून दुसरे पारितोषिक २१ लाख आणि तिसरे ११ लाखांचे असेल. जिल्ह्यातील सर्व शाळांनी या उपक्रमात सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.

०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ