नदीबाबतची पर्यावरणीय समज व अंतर्दृष्टी विकसित होणे आवश्यक नद्या अमृतवाहिन्या करण्यासाठी संघटित प्रयत्न करूया - जलपुरूष राजेंद्रसिंह

 





नदीबाबतची पर्यावरणीय समज व अंतर्दृष्टी  विकसित होणे आवश्यक

नद्या अमृतवाहिन्या करण्यासाठी  
संघटित प्रयत्न करूया

- जलपुरूष राजेंद्रसिंह


अकोला, दि. १३ : पर्यावरणातील नदीचे स्थान अनन्यसाधारण आहे. प्रत्येकात त्याबाबतची समज व अंतर्दृष्टी  विकसित होणे आवश्यक आहे. 'चला जाणूया  नदीला' अभियानातून नद्या अमृतवाहिन्या करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडूया व अभियान यशस्वी करूया, असे आवाहन अभियानाच्या राज्यस्तरीय समितीचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी आज येथे केले.

अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन  सभागृहात  डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्य समितीचे सदस्य नरेंद्र चुग, श्री. कुलकर्णी, अभियानाचे समन्वयक अरविंद नळकांडे, प्रमोद सरदार, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपवनसंरक्षक रामास्वामी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सुधीर राठोड यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, राज्य सरकार या अभियानाकडे अत्यंत गांभीर्याने पहात आहे.  यंत्रणांनी अभियान राबविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करतानाच अधिकाधिक लोकसहभागही मिळवावा. नदीला आपण आईची उपमा दिलेली आहे मात्र तिच्याशी व्यवहार चुकीच्या पद्धतीने करतो आहोत, ही परिस्थिती बदलण्यासाठी गाव पातळीवर जनजागृती करून नदी अमृत वाहिनी करण्यासाठी गावकऱ्यांचा सहभाग मिळवावा, असे आवाहन त्यांनी केले.  

महाराष्ट्रात नदी महोत्सव, तसेच 75 नद्यांचे पुनरूज्जीवन केले जाणे ही आनंदाची बाब आहे.  या मोहिमेत जलबिरादरीचा पूर्ण पाठिंबा आहे. नद्यांचे प्रदूषण थांबविणे, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी आपला नदीशी आपला व्यवहार कसा आहे, हे तपासणे आवश्यक आहे. पर्यावरण व नदीवर प्रेम करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.

विविध योजनांच्या माध्यमातून खोलीकरण, रुंदीकरण, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदी बाबींवर प्रामुख्याने उपाययोजना कराव्यात, तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने नदीकिनाऱ्यावर व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे, अशा सूचना राजेंद्र सिंह यांनी यावेळी केल्या.

नदी शुध्द, स्वच्छ आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी व पुढच्या पिढीला एक चांगला वारसा देण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
 
000000



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ