जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाला प्रारंभ - डॉ. दिलीप रणमले

 

जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाला प्रारंभ

-         डॉ. दिलीप रणमले

अकोला, दि. 31 : जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली असून, दि. 13 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे आरोग्य सहायक संचालक (कुष्ठरोग निर्मूलन) डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.

 

 

 

 

कुष्ठरूग्णांकडे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही. नियमित उपचार घेणा-या रुग्णांपासून इतरांना मुळीच अपाय नाही हे माहित असूनही सुशिक्षीत व्यक्तीही त्यांना टाळतात. ही हीनतेची भावना नष्ट व्हावी आणि हा रोग औषधोपचाराने विकृती न येता पूर्णपणे बरा होतो हा संदेश जनमानसावर ठसवण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. अभियानात घरोघरी सर्वेक्षण करुन नविन कुष्ठरूग्णांचा शोध घेतला जाईल, जुन्या रूग्णांना भेटून नियमित उपचार घेतल्याची खातरजमा करणे, विकृती प्रतिबंधक सल्ला व सेवा देणे आदी कामे केली जातील. त्याचप्रमाणे, कुष्ठरूग्णांना शासनाच्या एस.टी. व रेल्वे मोफत प्रवास योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी आवास योजना आदी योजनांची माहिती दिली जाईल, असे डॉ. रणमले यांनी सांगितले.

 गांधीजींच्या कार्यातून अभियानाची प्रेरणा

कुष्ठरोगी रुग्णाला समाजात मानाचे स्थान मिळवुन देण्याचा सर्वप्रथम प्रयत्न महात्मा गांधीनी केला. कुष्ठरोगी रुग्णांना समाजात हीन दर्जाची वागणुक दिली जात होती. या आजाराला धार्मिकतेशी जोडून हे पुर्व जन्मीचे पाप आहे असे सांगून रोगींना घराबाहेर काढले जात होते. त्यांच्यावर उपचार केले जात नव्हते व सामाजिक तिरस्कारांचा सामना करावा लागत होता. मिठाच्या सत्याग्रहामुळे सन 1932 मध्ये महात्मा गांधी हे येरवड्याच्या कारागृहात असताना परचुरे शास्त्री हेही तिथे होते. परचुरे शास्त्री यांना कुष्ठरोग असल्यामुळे त्यांना सर्वापासुन वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले होते. गांधीजींनी भेटीची वारंवार विनंती करुनही त्यांना भेटू  दिले गेले नाही. कुष्ठरूग्णांची अवस्था पाहून गांधीजींनी त्यांची सेवा करण्याचा निश्चय केला. त्यांनी परचुरे शास्त्रींना वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात बंदीवास संपल्यानंतर आणले व ते जिवंत असेपर्यंत सलग तीन वर्षे सेवा केली.  कुष्ठरूग्णांबाबत समाजात असलेली हीन भावना दुर करण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला, परचुरे शास्त्रींच्या निधनानंतर महात्मा गांधींनी आपल्या अठरासूत्री कार्यक्रमात कुष्ठरोग निर्मूलन हा विषय समाविष्ट केला. या कार्यापासून प्रेरणा घेऊन स्पर्श अभियान राबविण्यात येत आहे, असे डॉ. रणमले यांनी सांगितले.

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ