विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रम मर्यादित काळापुरता न ठेवता सातत्यपूर्ण अंमलबजावणी करा - केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक संचालक रोशन थॉमस

 



विकसित भारत संकल्प यात्रा  

            उपक्रम मर्यादित काळापुरता न ठेवता सातत्यपूर्ण अंमलबजावणी करा

                                     - केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक संचालक रोशन थॉमस        

अकोला, दि. 12 : ‘विकसित भारत संकल्प यात्रे’द्वारे विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम होत आहेत. हा उपक्रम मर्यादित काळापुरता न राहता स्थानिक प्रशासनाकडून सातत्यपूर्ण अंमलबजावणी होऊन त्याला ‘विकसित अकोला संकल्प यात्रा’ असे स्वरूप यावे, अशी अपेक्षा केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक संचालक रोशन थॉमस यांनी आज येथे व्यक्त केली. 

 

मोहिमेच्या अनुषंगाने श्री. थॉमस यांच्या अध्यक्षतेखाली  आढावा बैठक लोकशाही सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महापालिकेच्या आयुक्त कविता द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा समन्वय अधिकारी गजानन महल्ले व अनेक अधिकारी उपस्थित होते.

 श्री. थॉमस म्हणाले की, सर्वसामान्य घटकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट ठेवून योजनांचा लाभ गरजूंपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी या माध्यमातून होत आहे.

 यात्रेच्या माध्यमातून आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, आवास योजना, उज्ज्वला योजना, विश्वकर्मा, किसान सन्मान, किसान क्रेडिट कार्ड, पोषण अभियान, हर घर जल-जल जीवन मिशन, जनधन योजना, अटल पेन्शन योजना अशा अनेकविध योजनांची माहिती व लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. लोककल्याणासाठी या उपक्रमाची सातत्यपूर्ण अंमलबजावणी करून एक आदर्श मॉडेल निर्माण करावे, असे आवाहन श्री. थॉमस यांनी केले.

 

 

आतापर्यंत जिल्ह्यातील 347 गावात ही यात्रा पोहोचली असून, सुमारे पावणेदोन लाख नागरिक विविध ठिकाणी उपस्थित होते. मान्यवर लोकप्रतिनिधींनीही विविध ठिकाणी सहभाग घेतला. आरोग्य शिबिरांचा लाभ 21 हजार 334 व्यक्तींनी घेतला, तर सुमारे 1 लाख 13 हजार व्यक्तींना आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले. पीएम किसान सन्मान योजना, किसान क्रेडिट कार्ड यांचाही गरजूंना लाभ मिळवून देण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैष्णवी यांनी सादरीकरण केले. श्री. महल्ले यांनी आभार मानले,

00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ