‘माविम’तर्फे ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचा उत्साहात शुभारंभ

 






‘माविम’तर्फे ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचा उत्साहात शुभारंभ

 

·        मान्यवरांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती

·        बचत गटांच्या विविध वस्तूंची 50 दालने

 

अकोला दि. 6 : महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या वतीने स्त्री मुक्ती दिनानिमित्त नवतेजस्विनी भव्य विक्री व प्रदर्शनाचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ स्वराज्यभवन मैदानावर आज झाला. त्यात बचत गटांच्या विविध उत्पादनांची 50 दालनांचा समावेश असून, हे प्रदर्शन दि. 8 जानेवारीपर्यंत सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत चालणार आहे.

 

जि. प. अध्यक्ष संगीताताई अढाऊ, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार) डॉ. धनराज उंदीरवाडे, गुणवंत संस्थेच्या अरूंधती शिरसाठ, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नयन सिन्हा, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, ‘माविम’च्या जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.     

 

खेड्यापाड्यातील महिलाभगिनींकडून बचत गटांच्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाची उत्पादने निर्माण केली जातात. ती सर्वदूर पोहोचण्यासाठी व त्याला योग्य भाव मिळण्यासाठी त्यांचे विपणन व्यापकपणे झाले पाहिजे. बचत गटांसाठी शहरात  बाजारपेठेच्या ठिकाणी विक्री केंद्र उपलब्ध व्हावे, असे आमदार श्री. मिटकरी यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील बचत गटांसाठी शहरात स्वतंत्र विक्री दालन निर्माण करण्याचा प्रयत्न करू, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले. बचत गटांसाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र निर्माण होण्यासाठी जिल्हापरिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे जि. प. अध्यक्ष श्रीमती अढाऊ यांनी सांगितले. समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले.      

पहिल्याच दिवशी महिलांची मोठी गर्दी

तीन दिवसांच्या या प्रदर्शनात 80 बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे उत्पादित वस्तूंची विक्री होत आहे. त्यात रासायनिक रंग विरहित, कुठलीही भेसळ नसलेली, स्वादिष्ट, आकर्षक, दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील महिलाभगिनींनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट दिली.

शोभिवंत वस्तू, बांबूच्या टोपल्या, वारली चित्रे, गोडंबी, लोकरीच्या वस्तू, ज्वेलरी, मातीच्या वस्तू, झाडू, फडा, तसेच जिल्ह्यातील उत्पादित सेंद्रिय धान्य, सर्व प्रकारच्या डाळी खाण्याचे स्वादिष्ट पदार्थ, आवळा पदार्थ, तयार ढोकळा पीठ, सुगंधी मसाले, लोणची, पापड, केळी चिप्स, पॉपकॉर्न उपलब्ध आहेत. खीर मांडे, रोडगे, आवळा पुरणपोळी, रोडगे, झुणका भाकर अशा खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. सामाजिक जाणीव जागृती होण्याच्या हेतूने सांस्कृतिक कार्यक्रमही होत आहेत. अकोलेकरांनी नवतेजस्विनी विक्री प्रदर्शनाला अवश्य भेट देऊन बचत गटाच्या महिलाभगिनींचा उत्साह वाढवावा, असे आवाहन श्रीमती खोब्रागडे यांनी केले.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ