‘स्त्री मुक्ती दिना’निमित्त ‘माविम’तर्फे तीन दिवसांचे ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शन - जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे

 शनिवारी शुभारंभ; 80 बचत गटांचा सहभाग

‘स्त्री मुक्ती दिना’निमित्त ‘माविम’तर्फे तीन दिवसांचे ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शन

-          जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे

अकोला दि. 3 : महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती अर्थात स्त्री मुक्ती दिनानिमित्त दि. 6 ते 8 जानेवारीदरम्यान नवतेजस्विनी भव्य विक्री व प्रदर्शन स्वराज्यभवन मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 80 बचत गटांच्या महिला सदस्य त्यात सहभागी होतील, अशी माहिती ‘माविम’च्या जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांनी दिली.

प्रदर्शनाचा शुभारंभ दि. 6 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे उत्पादित वस्तूंची विक्री होणार आहे. त्यात रासायनिक रंग विरहित, कुठलीही भेसळ नसलेली, स्वादिष्ट, आकर्षक, दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.

मायक्रोमच्या शोभिवंत वस्तू, बांबूच्या टोपल्या, वारली चित्रे, गोडंबी, लोकरीच्या शोभिवंत वस्तू, घरातील, देव्हाऱ्यातील शोभिवंत वस्तू, ज्वेलरी, मातीपासून बनविलेले वस्तू, झाडू, फडा, तसेच खाण्याचे स्वादिष्ट पदार्थ, आवळा पदार्थ, तयार ढोकळा पीठ, सुगंधी मसाले, सर्व प्रकारची लोणची, पापड, केळी चिप्स, पॉपकॉर्न, तृणधान्य, कडधान्य, सर्व प्रकारच्या डाळी उपलब्ध असणार आहेत. खीर मांडे, रोडगे, आवळा पुरणपोळी, रोडगे, झुणका भाकर अशा खाद्यपदार्थांची विक्री येथे असेल.

प्रदर्शनात सुमारे 50 दालनांची उभारणी करण्यात येत असून सातही तालुक्यातील 80 बचत गटाच्या महिला सहभागी होतील. यावेळी 10 ते 12 लाख रू. पर्यंत उलाढाल होणे अपेक्षित आहे. महिलांना व्यावसायिक दृष्टिकोन व मार्केटिंग ज्ञान मिळावे या हेतूने तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच खरेदीदार- विक्रेता बैठक घेण्यात येणार आहे. सामाजिक जाणीव जागृती होण्याच्या हेतूने सांस्कृतिक कार्यक्रमही होतील. प्रबोधनकार पंकजपाल महाराज यांचा कार्यक्रम होणार आहे. सर्व अकोलेकरांनी नवतेजस्विनी विक्री प्रदर्शनाला अवश्य भेट देऊन बचत गटाच्या महिलाभगिनींचा उत्साह वाढवावा असे आवाहन श्रीमती खोब्रागडे यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ