राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मुंबईत कार्यक्रम; उपजिल्हाधिकारी परंडेकर, भालेराव यांचाही होणार गौरव

 राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मुंबईत कार्यक्रम; उपजिल्हाधिकारी परंडेकर, भालेराव यांचाही होणार गौरव


निवडणुकीच्या उत्कृष्ट कार्यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना पारितोषिक


अकोला, दि. २२ :मतदार नोंदणीसाठी २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ दरम्यान राबविला गेलेला घरोघरी भेटीद्वारे पडताळणी कार्यक्रम, मतदार याद्यांचा निरंतर पुनरीक्षण कार्यक्रम, तसेच छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमात मतदार नोंदणी व  जनजागृती आदी निवडणूक कामकाजाच्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पारितोषिक जाहीर झाले आहे.

दि. १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रसिध्‍द झालेल्‍या प्रारुप मतदार यादीनुसार दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी अकोला जिल्‍ह्याची एकूण मतदार संख्‍या ही १५ लक्ष ३३ हजार ९९३ इतकी होती व त्‍यापैकी १८-१९ वयोगटातील मतदार संख्‍या ही ४ हजार १२ (०.२६ टक्के)  इतकी होती.

जिल्‍हाधिकारी श्री.अजित कुंभार यांनी विशेष मोहिमेअंतर्गत वय वर्षे १८ ते १९ वयोगटातील पात्र मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करुन शाळा, महाविद्यालये, युवा महोत्‍सव, सार्वजनिक ठिकाणी तसेच मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी भेटी देऊन, तसेच मतदान केंद्रांवर नोंदणीचे कार्यक्रम राबविण्‍यात आले. जिल्‍ह्यात विविध नाविन्‍यपुर्ण उपक्रम राबविल्याने मतदार संख्‍या ही २० हजार ६३३ (१.४१ टक्के) पर्यंत वाढविण्‍यात यश प्राप्‍त झाले.

 त्याचप्रमाणे, मतदार यादीतील पुरुष-स्‍त्री लिंग गुणोत्‍तर प्रमाण  प्रारुप मतदार यादी मध्‍ये ९३०  होते. ते आता अंतिम मतदार यादीमध्‍ये लिंग गुणोत्‍तर हे ९३८ इतके आहे. महिला मतदारांच्‍या संख्‍येत प्रारुप मतदार यादीच्‍या तुलनेत एकूण १९ हजार ८१४ इतक्‍या मतदारांची वाढ झाली आहे. ही वाढ २.६८ टक्के इतकी आहे व लिंग गुणोत्‍तर ८ गुणांकानी वाढले आहे. अंतिम मतदार यादीमधील एकूण मतदार संख्‍या आज रोजी १५ लक्ष ६२ हजार ७० इतकी असून त्‍यामध्‍ये प्रारुप मतदार यादीच्‍या तुलनेत २८ हजार ७७ इतक्‍या मतदारांची वाढ झाली आहे.

त्‍याचप्रमाणे, भटक्‍या व विमुक्‍त जमातीमधील मतदारांची नोंदणी करण्‍यासाठी सेवाभावी संस्‍थेच्‍या सहाय्याने जिल्‍ह्यातील पात्र मतदारांचा शोध घेऊन त्‍यांचे प्रत्‍यक्ष वास्‍तव्‍य असलेल्‍या ठिकाणी वाडी, वस्‍ती, पाड्यांवर जाऊन विशेष शिबीराचे आयोजन करण्‍यात आले व त्‍या माध्‍यमातून   मतदारांची नाव नोंदणी करण्‍यात आली.

नाविन्‍यपूर्ण उपक्रमात सार्वजनिक गणेशोत्‍सव, नवरात्र उत्‍सव, कावड यात्रा इत्‍यादी ठिकाणी मतदार नाव नोंदणीबाबतचे स्‍टॉल लावून त्‍याठिकाणी अर्ज भरुन घेण्‍यात आले. जिल्‍ह्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, कर वसुली लिपीक व मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी  यांच्या स्‍तरावर विशेष मोहिम राबवून त्‍यांचे कार्यक्षेत्रातील पात्र मतदारांकडून मतदार नोंदणीबाबतचे अर्ज भरुन घेण्‍यात आले.

परंडेकर, भालेराव यांचाही होणार गौरव

निवडणूकविषयक कामकाजामध्‍ये केलेल्‍या उल्‍लेखनीय कामगिरीबद्दल उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांना तसेच अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणी व मतदार यादीचे शुध्‍दीकरण यासाठी केलेल्‍या विशेष प्रयत्‍नांबाबत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी (महसूल) अनिता भालेराव यांना गौरविण्‍यात येणार आहे. मुंबईत
दि. २४ जानेवारीला चर्चगेट नजिक जयहिंद महाविद्यालयात सकाळी ११ वा. हा  कार्यक्रम होईल. निवडणूक कार्यात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरीबाबत विभागनिहाय निवड जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांना अमरावती विभागातून उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून गौरविण्यात येणार आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ