विशेष लेख :मधमाशी पालन; शेतीपूरक, पर्यावरणपूरक व्यवसाय



मधमाशीचे अस्तित्व हे शेती सारख्या परागिभवन या प्रक्रियेचे अत्याधिक महत्त्व असलेल्या व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे होय. हे एक प्रकारचे सहचर्य होय. मधाचे आहारातील महत्त्व लक्षात घेता, मधाचे उत्पादन हे सुद्धा शेतकऱ्यांना पुरक उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांमध्ये या पर्यावरणपूरक जोड व्यवसायाची जाणीव जागृती व्हावी म्हणून  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाअंतर्गत मध उद्योग विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. विशेषत्वाने डोंगराळ व जंगल विभागातील मधपाळांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आला आहे. मंडळामार्फत मधमाशा पालन उद्योगासाठी मध केंद्र योजना व अर्थसहाय्य / अनुदान ही योजना राबविले जाते. मंडळामार्फत या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते व सवलतीच्या दरात मध पेट्यांचा, मध यंत्राचा पुरवठा करण्यात येतो. तसेच या उद्योगांतर्गत उत्पादन, संशोधन, मध प्रक्रिया, विक्री, राणी माशी पैदास इत्यादि कार्यक्रमही मंडळामार्फत हमी भावाने हाती घेण्यात येतात.

मधउद्योग हा एक उत्तम ग्रामोद्योग आहे, त्यासाठी जागा, इमारत, वीज, पाणी अशा भांडवली गुंतवणूकीची आवश्यकता नाही. रोजगार निर्मितीची उत्तम क्षमता या व्यवसायात आहे.  असून, वाया जाणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा चांगला उपयोग केला जातो. पाळता येणाऱ्या जातीच्या माशा (सातेरी मेलिफेरा), मधमाशांना उपयुक्त असा मकरंद व पराग देणाऱ्या वनस्पतींची उपलब्धता व त्यांच्या फुलोऱ्याचे सातत्य, मधमाशांना हाताळण्याचे व त्या उद्योगातील विविध तंत्राचे ज्ञान प्रशिक्षण, प्रमाणित व योग्य उपकरणांचा पुरवठा, मधमाशांचे रोग, शत्रू व त्यांच्या नियंत्रणाची माहिती या बाबी मधउद्योगासाठी आवश्यक आहेत.

महाराष्ट्र शासनाने दिनांक १८ जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपूर्ण राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. मधमाशा संरक्षण-संवर्धनासाठी जनजागृती व प्रसार-प्रचार, निःशुल्क प्रशिक्षण व कौशल्य विकास, ५० टक्के अनुदानावर साहित्य वाटप, उत्पादित मधाची मंडळामार्फत खरेदी हमी, उपउत्पादने तयार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण, उपउत्पादने तयार करणेसाठी ५० टक्के अनुदानावर साहित्य वाटप, मंडळातर्फे उपउत्पादनांच्या खरेदीची हमी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा ही मधकेंद्र योजनेची वैशिष्ट्ये आहेत.

याअंतर्गत खालीलप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते

अ) प्रगतीशील मधपाळ व प्रशिक्षण (केंद्रचालक) – केंद्रचालक, मधपाळ. यांना मध संचालनालय महाबळेश्वर येथे २० दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येते.

ब) मधपाळ प्रशिक्षण : वैयक्तिक शेतकरी अर्जदार यांना मध संचालनालयामार्फत जिल्ह्याच्या किंवा स्थानिक ठिकाणी १० दिवसाचे निवासी प्रशिक्षण देण्यात येते.

क) मधमाशा पालन छंद प्रशिक्षण: शेतकरी, शाळा, कॉलेज, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शासकीय सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांना मधमाशा पालन एक छंद म्हणून ५ दिवस मुदतीचे छंद प्रशिक्षण देण्यात येते.

मधुमक्षिका पालन अर्थसहाय्य, अनुदान

योजने अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थींना मधमाशा पालन उद्योगासाठी लागणारे मधपेट्या व इतर साहित्याच्या स्वरुपात ५० टक्के टक्के अनुदान देण्यात येते. व उर्वरित ५० टक्के स्वगुंतवणूक लाभार्थीने करणे आवश्यक आहे. मध खरेदी केंद्रचालक व मधपाळ या मधमाशापालन उद्योजकांनी उत्पादित केलेला मध व मेण मध संचालनालयामार्फत हमी भावाने खरेदी केला जातो.

                                                                संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना