पशुसंवर्धन किसान क्रेडीट कार्ड योजना: पशुपालक व्यवसायीकांनी कर्ज योजनेचा लाभ घ्यावा


अकोला दि.26(जिमाका)-  दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुट पालक व्यवसायीकांसाठी पशुसंवर्धन किसान क्रेडीट कार्ड योजनेतर्गंत कर्ज उपलब्ध केले जाते. या कर्ज योजनेचा पशुपालक व्यवसायीकांनी लाभ घेण्यासाठी स्थानिक पशुवैद्यकीय संस्था व स्थानिक बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी कृषी कर्ज मिळते त्याचप्रमाणे पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुसंवर्धन किसान क्रेडीट कार्ड योजनेतर्गंत कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील पशुपालक दुग्धव्यवसाय, शेळी व कुक्कट पालन व्यवसाय करणाऱ्यांना पशुपालक व्यवसायीकांस खेळत्या भांडवलाकरिता कर्ज उपलब्ध होणार आहे.

भांडवल कर्ज दर याप्रमाणे : दुध व्यवसाय (1 मुऱ्हा म्हैस किंवा 1 संकरीत गाय) करिता 32 हजार रुपये, शेळी पालन (10 शेळया+1 नर) करिता 17 हजार रुपये, कुक्कुट पालन ब्रॉयलर व कुक्कुट पालनलेअर ब्रॉयलर (1000 पक्षी) करिता प्रत्येकी 60 हजार रुपये खेळते भांडवल कर्ज उपलब्ध होणार आहे. या योजनेतर्गंत पशुपालक व्यवसायीकाकरिता कर्जाची कमाल मर्यादा 3 लाख रुपये राहिल. यामध्ये 1 लाखपर्यंत किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पिक कर्ज व 2 लाखपर्यंत पशुपालक व मत्सव्यवसायाचे कर्जाचा समावेश राहील. या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकीय संस्थेंशी संपर्क साधावा. तसेच स्थानिक बँकेतील शाखा व्यवस्थापकांचे मार्गदर्शन घ्यावे.

पशुसंवर्धन हा शाश्वत व्यवसाय असून पुशसंवर्धन व्यवसायामध्ये प्रतिकूल हवामानाचा परिणाम कृषी क्षेत्रापेक्षा कमी होतो. पशुजन्य उत्पादनाच्या किंमतीत मोठया प्रमाणात चढउतार होत नाहीत. तसेच पशुसाठी विमा छत्र उपलब्ध असल्याने या व्यवसायामध्ये जोखीम कमी आहे. यामुळे सर्व स्थानिक शाखा व्यवस्थापकांनी पशुव्यवसायीकास योजनेतर्गंत कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ