महात्मा फुलेंचे विचार घरोघरी पोहोचविणे गरजेचे; जयंती समारंभात मान्यवरांचे प्रतिपादन







अकोला, दि.११(जिमाका)-
महात्मा जोतिबा फुले यांचे विचार बुद्धिप्रामाण्यवादावर आधारलेले होते.  त्यांचे स्त्रिया आणि दलितांचे शिक्षण, जातीभेद निर्मूलन, धर्मचिकित्सा यासारखे विविध क्षेत्रातील कार्य महनीय आहे. क्रांतीकारक कार्य व विचारांमुळेच महात्मा फुले हे क्रांतीसूर्य ठरले. त्यांचे विचार आजही घराघरापर्यंत पोहोचविणे  गरजेचे आहे, असे प्रतिपादन महात्मा जोतिबा फुले जयंती समारंभातील मान्यवर वक्त्यांनी केले.

येथील जिल्हा नियोजन सभागृहात महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे अध्यक्षस्थानी होते.  अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, प्रांताधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा सुचना विज्ञान केंद्राचे अनिल चिंचोले,  जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने,अधीक्षक मीरा पागोरे, मलकापुर कला महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिलीप सूर्यवंशी, अ. भा.अंनिसच्या  विदर्भ संघटक डॉ. स्वप्ना लांडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदीप सुसतकर, उमा जोशी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन झाली. यावेळी राज्य घटनेच्या उद्देशिकेचेही पूजन करण्यात आले.

क्रांतिकारक विचार व कार्यामुळेच ठरले क्रांतीसूर्य- डॉ. सूर्यवंशी

डॉ. दिलीप सूर्यवंशी म्हणाले की, महात्मा जोतिबा फुलेंनी जातीभेद निर्मूलन, स्त्री शिक्षण, मागासवर्गियांना शिक्षण, धर्म चिकित्सा हे कार्य केले. त्यांनी ज्या काळात हे कार्य केले त्या वेळी ते करणे अत्यंत कठीण होते. समाजातील लोकांचा विरोध सहन करावा लागला. त्यातून त्यांना त्रासही झाला. मात्र त्यांनी संघर्ष करीत आपले कार्य सुरु ठेवले. त्याचा परिणाम म्हणजे आज समाजात झालेले परिवर्तन  आहे. त्यांच्या या कार्यामुळेच ते क्रांतीसूर्य ठरतात, असे प्रतिपादन डॉ. सूर्यवंशी यांनी केले. त्यांचे विचार घरोघरी पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बुद्धीप्रामाण्यवाद हा फुलेंच्या विचारांचा पाया- डॉ. स्वप्ना लांडे

डॉ. स्वप्ना लांडे म्हणाल्या की, परंपरा सांगतात म्हणून सत्य मानू नका असे सांगणारे महात्मा फुले यांनी परंपरेनुसार रुजलेल्या सर्व अनिष्ट प्रथा व परंपरांचा विरोध केला. समाजात सुधारणा करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी धर्म चिकित्सेसोबतच स्त्री पुरुष समानता, लिंग समभाव या विचारांचा पुरस्कार करुन त्याचा अवलंबही केला. स्त्री शिक्षणाची क्रांती करतांना आधी स्वतःच्या पत्निला शिक्षण दिले. समाजातील सर्वधर्माच्या लोकांनी  गुण्यागोविंदाने नांदावे, असे त्यांचे ध्येय्य होते.  विधवांचे कल्याण, विधवा विवाहास मान्यता यासारख्या धर्म सुधारणांपासून  ते मोफत व सक्तिचे प्राथमिक शिक्षण यासारख्या धोरणांचे ते पुरस्कर्ते होते, असे डॉ. लांडे यांनी सांगितले.

महात्मा फुलेंचे कार्य सर्व समाजासाठी- उमेश सोनवणे

जात पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनवणे यांनी आपल्या संबोधनात महात्मा फुलेंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, महात्मा फुलेंचे कार्य हे समाजातील सर्व दीन दलित उपेक्षितांसाठी, स्त्रियांसाठी होते.  समाज सुधारक हे सर्व समाजाचे असतात. त्यांचे कार्य हे सर्व समाजाच्या लोकांसाठी होते, असे सोनवणे यांनी सांगितले.  

समाज सुधारणांचा पाया रचला- संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले यांनी आधुनिक भारताच्या सामाजिक सुधारणांचा पाया रचला. त्यांचे कार्य साऱ्यांसाठी प्रेरणा देणारे आहे. त्यांचे कार्य हे समाजातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याने त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात शाहीर मधुकर नावकार व त्यांच्या सहकाऱ्यांनी महात्मा फुले यांच्या विचार कार्यावर आधारीत पोवाडा सादर केला. प्रास्ताविक प्रदीप सुसतकर यांनी आभार इंगळे यांनी तर सूत्रसंचालन केतन वाघोडे यांनी केले. त्यानंतर समता पर्वातील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

००००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ