शेतीला पशुपालनाची जोड; गाईचे शेण व मुत्र ठरणार आर्थिक स्त्रोत; पंचगव्य आधारीत पशुवैद्यक उपचार; स्नातकोत्तर पशुवैद्यक महाविद्यालयात संशोधन

अकोला, दि.२४(डॉ.मिलिंद दुसाने)- ‘गाईचे दुध, दुधाचे दही, दह्याचे लोणी, लोण्याचे तूप….’ या एका बडबडगिताच्या ओळी. गाईच्या दुधाचे महत्त्व व दुधावरील प्रक्रिया सांगतात. गाईच्या दुधापेक्षा शेण व गोमुत्र हे आर्थिक उत्पन्न देऊ शकते,असे एक गृहितक मांडले जाते.अर्थात ह्या गोष्टीला शास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय सुद्धा आधार हवा. त्यासाठी अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था ‘पशुंच्या आजारावरील उपचारासाठी  पंचगव्य औषधी’ हे संशोधन करीत असून गोपालक शेतकऱ्यांना प्रशिक्षितही करण्यात येत आहे.

 गाय आणि बैल शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. बैल शेतीत विविध कामांसाठी उपयुक्त तर गाय दुध देते म्हणून तिला महत्त्व. किंबहुना गाय व गोवंश हा शेतीचा अविभाज्य घटक आहे. तथापि, गाईचे दुध हे ‘बाय प्रॉडक्ट’ असून गोमय म्हणजेच शेण व गो मुत्र हे खरे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनवणारे उत्पन्न आहे,असा तज्ज्ञांचा दावा आहे.

 जिल्हा नियोजन समितीकडून निधी

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत पंचगव्य आधारीत औषधींचा पशुवैद्यक उपचारांमध्ये उपयोग याबाबत प्रथमच संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.देशपातळीवर अशाप्रकारचे संशोधन प्रथमच होत आहे, हे विशेष. या प्रकल्पास जिल्हा नियोजन समितीकडून ‘आत्मा’ अंतर्गत दोन लक्ष ७० हजार रुपयांचा निधीही मिळाला आहे, अशी माहिती सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे यांनी दिली.

 ५२० शेतकऱ्यांना प्रशिक्षण

देशी वंशाच्या गाईंवर हे संशोधन होत असून डॉ. प्रशांत कपाले हे मुख्य प्रकल्प संशोधक म्हणून काम करीत आहेत. पंचगव्य औषधी आणि गो आधारीत पदार्थ निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळाही त्यांनी घेतल्या. आतापर्यंत ५२० गोपालक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाला प्रात्यक्षिकाची जोड देण्यासाठी म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प व गो-अनुसंधान केंद्र देवलापार, जि.नागपूर यांच्याशी सामंजस्य करारही करण्यात आला आहे. याशिवाय राधाकृष्ण तोष्णिवाल आयुर्वेद महाविद्यालयातील तज्ज्ञ वैद्यही या प्रकल्पात सहाय्य करीत आहेत.

 पशुंच्या विविध आजारांवर उपचारासाठी संशोधन

डॉ. कपाले सांगतात की, पंचगव्य म्हणजे  गाईचे दूध, तूप, दही, गोमय,मुत्र या पासून तयार केलेले पदार्थ. आर्युर्वेदात मानवांच्या आजारांवरील विविध औषधी निर्माणात पंचगव्याचा वापर पूर्वीपासून केला जातो. अनेक संशोधकांनी त्यावर पेटंट्स ही मिळवली असल्याची माहिती डॉ. कपाले देतात. तसेच यावर देशात अनेक ठिकाणी संशोधन सुरु आहे. मात्र स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत पशुंमधील आजारांवरील उपचारात पंचगव्य औषधींचा वापर करण्याबाबत संशोधन सुरु आहे.  विशेषतः पशुंमध्ये स्तनदाहसारखा आजार ज्यामुळे पशु एकदम निकामी होतो. किंवा अन्य विषाणूजन्य आजार,  अथवा अलिकडे ज्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला तो ‘लम्पि’सारखा आजार,  अशा आजारांमध्ये पंचगव्य औषधींचा वापर करण्यावर संशोधन करण्यात येत आहे. याचे फायदे असे की, ह्या औषध निर्मितीची शास्त्रशुद्ध प्रक्रिया शेतकऱ्यांना शिकविली जाईल, त्यामुळे शेतकरी गो-पालन व संगोपनाकडे वळतील. शिवाय शेण व मूत्राचे बाजारमूल्य लक्षात येईल.

या संस्थेत शेतकऱ्यांना पंचगव्य औषधी, शेणापासून विविध उपयुक्त वस्तू, खते, गो मूत्रापासून औषधांची निर्मिती, धूप, साबण, दन्त मंजन यासारख्या दैनंदिन जीवनातील वस्तूंचे उत्पादन व त्याचे विपणन शिकविले जात आहे. त्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पाच्या गोशाळेत दिले जात आहे.  

 रसायन शास्त्र काय म्हणते?

गोमुत्रातील घटकः  पाणी-९५ टक्के, युरिया-२.५ टक्के, क्षार, मुलद्रव्ये व संप्रेरके-२.५ टक्के

गो मय (शेण) घटकः पाणी-८३ टक्के, नत्र-१.१९, फॉस्फरस-०.३, पोटॅशियम-०.४८, सोडियम-०.१९,कॅल्शियम-२.६० टक्के, मॅग्नेशियम-०.५६ टक्के, कार्बन-३५.५० टक्के, राख-५.४० टक्के.

गाईच्या दुधातील घटक- पाणी ८७ टक्के,  प्रथिने-३.३ टक्के, चरबी- ३.५ ते ४.५ टक्के, लॅक्टोज- ४.५ टक्के, सोडियम-४३ मिग्रॅ, कॅल्शियम-११८ मिग्रॅ, लोह-०.०३ या शिवाय  गाईच्या दुधात व्हिटामिन ड आणि क असते, तसेच इतर मुलद्रव्येही असतात.

 










गाईच्या शेण व मुत्राचे अर्थकारण

 एक गाय वर्षभरात १५०० ते २००० किलो शेण देते. तसेच ७०० ते ८००- लिटर मूत्र देते. वर्षभरासाठी हे मुत्र व शेण हे दोन एकर जमिनीला जैविक खत म्हणून पुरेसे आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना खते आणि किटकनाशकांच्या वापरात मोठ्या प्रमाणात बचत होते. त्याचे आजच्या बाजारमुल्यानुसार एकरी मूल्य हे किमान ३० ते ४० हजार इतके असेल. या व्यतिरिक्त गाय जर दुधाळ असेल तर मग ते उत्पन्न अधिकचे समजावे.  याच गाईचे शेण व मूत्र जर शेतकऱ्यांनी प्रक्रिया केले व त्यापासून  साबण, शॅम्पू, दन्त मंजन,  धूप ,  फिनाईल,  विविध प्रकारची औषधी बनविली तर त्याचे उत्पन्न अधिक होते.  या शिवाय गाईच्या शेणाच्या गोवऱ्या  व तत्सम उत्पादने तयार केल्यास त्यास सुद्धा बाजार भाव मूल्य अधिक प्राप्त होते. केवळ एका गाईच्या शेणापासून गोबर गॅस तयार केल्यास प्राप्त होणाऱ्या इंधनाची किंमत एक लाख रुपयांहून अधिक असेल.

शेतकऱ्यांनी हे अर्थकारण समाजावून व प्रत्यक्ष प्रशिक्षण घेऊन शेतीला पशुपालनाची जोड दिल्यास अर्थार्जनाचे मोठे दालन उघडू शकेल, असे डॉ. धनंजय दिघे यांनी सांगितले आहे.

००००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ