जिल्हा स्त्री रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आग नियंत्रण प्रशिक्षण व रंगीत तालीम









अकोला, दि.12(जिमाका)-आगीमुळे होणाऱ्या घटना टाळणे व त्यावरील उपाययोजना याबाबत सराव व्हावा म्हणून आज जिल्हा स्त्री रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘रंगीत तालीम’(मॉक ड्रिल) द्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

महानगरपालिका व आपत्ती व्यवस्थापन संयुक्त विद्यमाने ही रंगीत तालीम आज पार पडली. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यासंदर्भात निर्देशित केले होते त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या सुचनेनुसार आज रंगीत तालीम घेण्यात आली. आज सकाळी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी एम.एच. मणियार, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक सुधीर कोहचाळे, शैलेंद्र मडावी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदिप साबळे, तलाठी सुनिल कल्ले, प्रशासकीय अधिकारी आप्पासाहेब डांबरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भुपेन्द्र पाटील, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. रवि खंडारे, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

उपकरण हाताळणी व प्रात्यक्षीक

उन्हाळ्यांमध्ये आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अशावेळी करावयाच्या प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक उपाययोजना याबाबत  उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. उपस्थितांना अग्निशमन यंत्र हाताळणी बाबत माहिती दिली. आग निर्माण करुन यंत्राद्वारे ती विझवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच अग्निवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करावा याबाबत तसेच आगीचे प्रकार याबाबत सविस्तर माहिती दिली.

अग्निशमनासंदर्भात घ्यावयाची खबरदारी

सार्वजनिक इमारती उदा.रुग्णालय परिसरात अग्निशमन यंत्रणा स्थापित असावी. कालबाह्य होण्यापूर्वी नियमितपणे पूर्ण भरलेले असावे. अग्निशमन यंत्र बसविताना त्या यंत्राचा वापर करण्यासाठी सहज काढता येणे शक्य होईल, अशा ठिकाणी ते बसविण्यात यावे. 'फायर सेफ्टी ऑडिट' नुसार त्यातील त्रुटी दूर करून अग्निशमन यंत्रणा बसविण्यात यावे. तसेच रुग्णालयात स्प्रिंकलर, फायर अलार्म आणि स्मोक डिटेक्टर लावण्यात यावे, असे सूचना महानगरपालिकाचे फायर ऑफिसर एम.एच. मणियार यांनी उपस्थितांना दिली.

आगीचे प्रकार

‘ए’ प्रकारची आग : जेव्हा जळणारे पदार्थ कागद, लाकूड, कोळसा, प्लास्टीक, रबर यासारखे कार्बनयुक्त आणि घनरुप असतात. तेव्हा त्या आगीला ‘ए’ प्रकारची आग म्हणतात.

‘बी’ प्रकारची आग : जळणारा पदार्थ द्रवरुपात असतो किंवा कोणत्याही घनपदार्थांचे द्रवरुप जळत असते, तेव्हा त्या आगीला ‘बी’ प्रकारची आग म्हणतात. उदा. पेट्रोल, डिझेल, वंगण, रंसायने, रंग इत्यादी.

‘सी’ प्रकारची आग : ज्या आगीमध्ये ज्वलनशील वायुरुप किंवा द्रवरुप पदार्थाचे वायूरुप जळत असते, त्या आगीला ‘सी’ प्रकारची आग म्हटले जाते. उदा. स्वयंपाकाचा गॅस, वेल्डिंगचा गॅस इत्यादी.

‘डी’ प्रकारची आग : जेव्हा कोणताही धातू जळत असतो तेव्हा त्या आगीला ‘डी’ प्रकारची आग म्हटले जाते. उदा. सोडियम पोटॅशियम, मॅग्नेशियम, टिटॅनियम इ.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ