डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ‘प्रतापगड’ वसतीगृहाचे उद्घाटन शासनाच्या निर्णयांमुळे शेतकरी व कृषिक्षेत्राला पाठबळ-कृषिमंत्री अब्दुल सत्तार

 












अकोला दि.२८(जिमाका)- राज्य शासन हे शेतकऱ्यांना आणि कृषीक्षेत्राला पाठबळ देत आहे. त्यासाठी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. आताही नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन  राज्याचे कृषीमंत्री, अल्पसंख्याक विकास व औकाफ तथा प्रतिकुलपती अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले.

येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ‘प्रतापगड’ या मुलांच्या वसतीगृहाचे उद्घाटन  श्री.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

या समारंभाला कुलगुरु डॉ. शरद गडाख, विधानसभा तथा कार्यकारी परिषदचे सदस्य आ. रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील, जनार्दन मोगल, श्रीमती हेमलता अंधारे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी संचालक डॉ. श्यामसुंदर माने, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. फीत कापून वसतिगृहाच्या सुसज्ज इमारतीचे उदघाट्न करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कोनशीला अनावरण झाले.

शासनाच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना मदत

श्री. सत्तार म्हणाले की, विद्यापीठ म्हणजे भावी पिढी घडविण्याचे केंद्र होय.अशा या केंद्राला सर्व सुविधा देऊन सुसज्ज करण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करू. शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना व कृषी क्षेत्राला पाठबळ दिले आहे. एक रुपयात पीक विमा, शेतकरी सन्मान योजनेत केंद्रा प्रमाणे योगदान, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजनेत केलेली सुधारणा यामुळे शेतकऱ्यांना मोलाची मदत होत आहे. सध्या राज्यात गारपिटीचे आणि अवकाळी पावसाचे संकट आहे. अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

वसतिगृहांसाठी प्रस्ताव पाठवा

ते पुढे म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात यापुढे वसतिगृहात जागा नाही म्हणून एकही विद्यार्थी विद्यार्थिनी बाहेर राहणार नाही. त्यांना विद्यापीठाच्या आवारात वसतिगृह उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले.

बोंडअळी निर्मूलनासाठी पेरणी कालावधीबाबत उपाययोजना

कपाशी वरील बोंडअळी निर्मूलन करण्यासाठी कापूस बियाणे पेरणीचा कालावधी निश्चित करण्याबाबत शासनस्तरावर उपाययोजना करू, असेही त्यांनी सांगितले. राज्यशासनाने प्राथमिक शिक्षणापासुन कृषी हा विषय अभ्यासक्रमात घ्यावयाचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षकांची नेमणूक करतांना कृषी पदवीधर उमेदवारांना प्राधान्य देऊ असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. सत्तार यांनी विद्यार्थीनी व विद्यार्थी यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

कपाशी बियाणे पाकिटासोबत फेरोमेन सापळे द्या- आ. सावरकर

आ. रणधीर सावरकर यांनी सातत्याने होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत शासनाच्या भूमिकेचे स्वागत केले. हरभरा खरेदीसाठी मर्यादा वाढवून दिल्याबद्दलही आभार मानले. कपाशी वरील बोंड अळी निर्मूलनासाठी कपाशी पेरणी कालावधी निश्चित करावा, तसेच कपाशी बियाण्याच्या पाकिटासोबत फेरोमेन सापळे विनामूल्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही केली.

            कुलगुरू डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या विविध कामगिरीबद्दल माहिती दिली. तसेच विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांबद्दल माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. श्यामसुंदर माने यांनी तर सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी केले. तर डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

वसतिगृहाची वैशिष्ट्ये

 एकूण १४२३.६२ चौ. मी. बांधकाम क्षेत्रफळ असलेल्या या वसतिगृहाची इमारत दुमजली आहे. तळमजल्यावर २६ तर पहिल्या मजल्यावर १३खोल्या अशा एकूण ३९खोल्या आहेत. या इमारतीत एकूण ७९ मुलांच्या राहण्याची व्यवस्था असून तळमजल्यावर कार्यालय, अतिथीकक्ष, भोजनालय आदी सुविधा असून भांडार गृह, स्वछता गृह आदी सुविधा अद्यावत आहेत.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ