हॉटेल, रेस्टॉरंटमधील ‘मेनू’मध्ये भरडधान्याच्या पदार्थांचा समावेश करा-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

  अकोला,दि. २८ (जिमाका)- आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंटचालकांनी आपापल्या खाद्यपदार्थांच्या यादीत (मेन्यू)भरडधान्यापासून बनविलेल्या पदार्थांचा समावेश करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्याप्रमाणे राज्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्यात येत आहे. पौष्टिक तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, कोडो, कुटकी, सावा, राळा आणि राजगिरा आदी पिकांचा समावेश आहे. ही सर्व पौष्टिक तृणधान्य लोह, कॅल्शिअम, झिंक, आयोडीन सारख्या सुक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध आहे, तसेच ग्लूटेनमुक्त आहेत. पौष्टिक तृणधान्य डायरिया, बद्धकोष्टता आतड्याच्या आजारावर प्रतिबंध करतात. तसेच या तृणधान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, हृदयविकार, अॅनिमिया, उच्चरक्तदाबरोधक आहेत. पौष्टिक तृणधान्य आधारीत पदार्थ कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यास सक्षम असल्याने आहारामध्ये त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्याचे लोकांच्या आहारातील प्रमाण वाढविण्यासाठी त्याचा प्रचार, प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. तृणधान्याच्या उपयोगामुळे ग्राहकांना पौष्टिक अन्न पदार्थ उपलब्धता होऊ शकतील, त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये तयार होणाऱ्या आणि विक्री होणाऱ्या पदार्थांमध्ये ज्वारी, बाजरी आणि इतर भरडधान्याचा उपयोग करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त सागरकुमार तेरकर यांनी केले आहे.

०००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ