महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा दुसरा टप्पा: जिल्हास्तरीय प्रशिक्षण व सादरीकरण शुक्रवारी (दि.१४); नवउद्योजक, युवक- युवतींना सहभागाचे आवाहन

 अकोला,१२ दि.(जिमाका)-  महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा दुसरा टप्पा जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र शुक्रवार दि. १४ रोजी  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलांची), महसूल कॉलनी, बस स्टॅण्ड मागे, अकोला येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. यासाठी नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना असणाऱ्या आणि नवउद्योजक होवू इच्छिणाऱ्या युवक-युवती आणि नागरिकांनी प्रशिक्षण शिबीर व संकल्पना सादरीकरणासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. 

नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते. परंतु काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. याअनुषंगाने, जिल्हयातील नागरीकांच्या नाविन्यपूर्ण नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सादरीकरणास पारितोषिके

            जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र - प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उदयोजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजकांची व्याख्याने, तज्ज्ञ मार्गदर्शक व सल्लागारांची सत्रे, तसेच, नोंदणी केलेल्या नवउद्योजकांचे संकल्पना सादरीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे. सादरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व कृषी, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा व गतिशीलता आणि अन्य या क्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे प्रत्येकी १० मिनिटात सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीसमोर करण्याची संधी देण्यात येईल. यामधून जिल्हास्तरावर अव्वल तीन पारितेषिक विजेते घोषीत होतील. त्यामध्ये प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये, व्दितीय १५ हजार रुपये  आणि तृतीय दहा हजार रुपये  दिले जाणार आहे.

राज्यस्तरावर पारितोषिके

राज्यस्तरीय विजेत्यांची घोषणा व पारितोषिक समारोह - प्रत्येक जिल्हयातील सादरीकरण सत्रातील सर्वोत्तम ३ संकल्पनांमधून राज्यस्तरीय निवड तज्ज्ञ समितीद्वारे अंतिम विजेत्यांची निवड करण्यात येईल. यामधून वरील नमूद ७ क्षेत्रातील राज्यस्तरीय विजेत्यांना प्रथम पारितोषिक एक लाख रुपये,व्दितीय पारितोषिक ७५ हजार रुपये तसेच सर्वोत्कृष्ट महिला उद्योजक यांना एक लाख रुपये असे २१ पारितोषिके दि. १७ रोजी मा.राज्यपाल यांचे हस्ते राजभवन, मुंबई येथे वितरित होतील. तसेच विजेत्यांना पेटेंट सहाय्य, इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/निधी साठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, तसेच सॉफ्टवेअर क्रेडीटस, क्लाऊड क्रेडीटस इत्यादी सारखे लाभही पुरविण्यात येतील. 

सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरणासाठी जिल्हयातील जास्तीतजास्त विदयार्थी, युवक-युवती व नाविन्यपूर्ण नवउद्योजक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे संकेतस्थळ www.mahastartupyatra.in वर नोंदणी करावी आणि जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्रास दि. १४  रोजी सकाळी साडेनऊ वाजता  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलांची), महसूल कॉलनी, बस स्टॅण्ड मागे, अकोला या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा आणि अधिक माहितीसाठी    सहायक आयुक्त, जिल्हा कौशल् विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांचेकडे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी ९६६७७५७७८ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन ,प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलांची), महसूल कॉलनी, बस स्टॅण्ड मागे, अकोला  यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ