महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा: जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे थाटात उदघाटन

 





अकोला, दि.१४(जिमाका)-  येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे थाटात उद्घाटन करण्यात आले. विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

 या सोहळ्याप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त दत्तात्रय ठाकरे,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य  शरद झोडपे, उपप्राचार्य एस. आर. ठोकरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नयन सिन्हा,  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जी.व्ही चोपडे, प्रकाश जैयस्वाल,  उद्योजक उन्मेश मालू, अमित पडगिलवार आदी उपस्थित होते.

मानवाचा सामाजिक विकास घडविण्यामध्ये तसेच  समाजाच्या गरजापूर्ण करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे कार्य मोलाचे आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नवकल्पना  प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता असणाराच यशस्वी उद्योजक होवू शकतो. स्टार्टअप यात्रेच्या माध्यमातून नवउद्योजकांनी देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आ. डॉ. पाटील यांनी केले. ते पुढे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन नवकल्पनेच्या माध्यमातून ग्राहक डोळ्यासमोर ठेवत उत्पादनांची निर्मिती करावी. तसेच स्वत:च्या उन्नतीबरोबरच देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी नवकल्पनांचा उपयोग करावा, असे आवाहन आ. डॉ. पाटील यांनी केले.

            कार्यक्रमाची सुरुवात  मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन झाली. त्यानंतर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त दत्तात्रय ठाकरे यांनी प्रास्ताविकातून सांगितले की, युवक-युवतींमधील सुप्तगुण,कौशल्याला वाव मिळावा यासाठी शासनाने महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा हा उपक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात नवउद्योजक तयार होण्यास मदत होईल. नाविन्यपूर्ण संकल्पना पुर्णत्वास आणण्यासाठी तरुणांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.  प्राचार्य शरद झोडपे म्हणाले की, स्टार्टअपच्या माध्यमातून नवसंकल्पनांना वाव देऊन नवउद्योजकांना शासनाने एक संधी उपलब्ध करुन दिली आहे. या संधीचा नवउद्योजकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच कौशल्यावर आधारित तसेच रोजगाराच्यादृष्टीने सुरु करण्यात आलेल्या नवनवीन अभ्यासक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

स्टार्टअप प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण कार्यशाळेत जिल्ह्यातील उद्योजक उन्मेश मालू व अमित पडगिलवार यांनी आपल्या अनुभव कथानातून नवउद्योजकांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन संदिप पिसे यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश पुंडकर यांनी केले. यावेळी नवउद्योजक व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ