उर्जा विकास अभिकरण विभागाचा उपक्रम; उर्जा संवर्धन जनजागृतीकरीता चित्रकला स्पर्धा


अकोला,दि.20(जिमाका)- ऊर्जा संवर्धनाबाबत सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणार असून ऊर्जा बचतीसंदर्भात विविध विषयांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.

उर्जा बचतीबाबत शालेय विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांमध्ये जनजागृती व्हावी याकरीता ऊर्जा दक्षाता ब्यूरो, विद्युत मंत्रालय,भारत सरकारमार्फत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गट अ’ तसेच आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यासाठी ‘गट ब’ नुसार वर्गवारी करून ऊर्जा बचतीसंदर्भात विविध विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गट- अ मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीची मेणबती  पेटवा, राष्ट्रासाठी ऊर्जा वाचवा व  ऊर्जा बचतीचे नियम तयार करून स्वप्नांचे जग बनवूया या विषयावर तर गट- ब मधील विद्यार्थ्यांनी चला भविष्य लिहू, इलेक्ट्रिक वाहनावर स्विच  करू व आपण उठून आपला अभ्यास पूर्ण करूया, राष्ट्रासाठी ऊर्जा वाचवूया या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 उर्जा दक्षता ब्युरो यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, शालेय स्तरावरील 50 उत्कृष्ट चित्रांची निवड करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दि. 14 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांस प्रत्यक्ष स्थळावर चित्र काढण्यासाठी बोलविण्यात येईल. गट ‘अ’ व ‘ब’ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांस व प्रत्येकाबरोबर एका पालकांस रेल्वेच्या स्ल‍िपर क्लासने प्रवासाचा खर्च व प्रत्येक विद्यार्थ्यास दोन हजार रुपये व प्रमाणपत्र आयोजकामार्फत दिल्या जाईल.  तसेच राष्ट्रस्तरीय चित्रकला स्पर्धेत निवडलेल्या विद्यार्थ्यांस दिल्ली येथे दि. 12 डिसेंबर रोजी बोलविण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांस व प्रत्येकाबरोबर एका पालकांस रेल्वेच्या स्लिपर क्लासचे प्रवासाचा खर्च व प्रत्येक विद्यार्थ्यास दोन हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येईल.

राज्यस्तरीय पारितोषिक याप्रमाणे : प्रथम 50 हजार रुपये, द्वितीय 30 हजार रुपये, तृतीय 20 हजार रुपये  तर उत्तेजनार्थ 7 हजार 500 रुपये.  

राष्ट्रीय स्तरीय पारितोषिक याप्रमाणे : प्रथम  1 लक्ष रुपये, द्वितीय 50 हजार रुपये, तृतीय 30 हजार रुपये  तर उत्तेजनार्थ 15 हजार रुपये.   

             छायाचित्र स्पर्धेत विजेत्यांना राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन दि.14 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पारीतोषिक प्रदान करण्यात येतील. या स्पर्धेबाबतच्या नियम, अटी शर्तीची सविस्तर माहिती www.bee-studentsaward.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्हातील जास्तीत जास्त शाळांनी या उपक्रमात  सहभाग घेवून उर्जा संवर्धनाच्या राष्ट्रीय कार्यास सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ