विदर्भातील पूर्णाथडी म्हशीला मिळाले राष्ट्रीय मानांकन


अकोला, दि.10(जिमाका)- भारतीय कृषि अनुसंधान केंद्रातंर्गत राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्यूरो, कर्नाल (हरियाणा) यांच्या वतीने भारतातील नवीन नोंदणीकृत पशुधनाची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात पश्चिम विदर्भातील पूर्णाथडी म्हशीला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुरचे कुलगुरू डॉ. कर्नल आशीष पातूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशूविज्ञान संस्था या घटक महाविद्यालयातील पूर्णाथडी म्हशींचे अभ्यासक डॉ. शैलेन्द्र कुरळकर व डॉ. एस. साजिद अली यांनी कर्नाल येथील डॉ. विकास व्होरा आणि डॉ. आर. एस. कटारिया या शास्त्रज्ञांच्या समन्वयातून स्थानिक पूर्णाथडी म्हशीचा शास्त्रोक्त अभ्यास करून राष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले.

 सद्यस्थितीत महाराष्ट्रात नागपुरी, पंढरपूरी आणि मराठवाडी या प्रमुख जाती असून आता यात पूर्णाथडी म्हशींची जात नव्याने समाविष्ट झाली आहे. नागपुरी म्हशींपेक्षा रंगाने फिकट राखाडी रंगाच्या म्हशी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीकाठी असलेल्या भागात विशेषत्वाने आढळतात. स्थानिक पातळीवर यांना भुरी, राखी, गवळी अशा नावानेही संबोधले जाते. पूर्णाथडीच्या दुधात स्निग्धाचे प्रमाण सरासरी आठ टक्के असल्याने तसेच मध्यम आकारमान, दुधातील स्निग्धाचे उच्च प्रमाण, उत्तम प्रजनन क्षमता, कमी व्यवस्थापन खर्च आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विदर्भातील उष्ण हवामानात तग धरून राहण्याची क्षमता या गुणधर्मामुळे लघु आणि मध्यम म्हैसपालकांमध्ये पूर्णाथडी विशेष लोकप्रिय आहे. याप्रसंगी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे यांनी पूर्णाथडी म्हशींचे अभ्यासक प्रा. डॉ. शैलेन्द्र कुरळकर आणि डॉ. एस. साजिद अली यांचे कौतुक केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ