पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 अकोला,१३ दि.(जिमाका)-  प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत हवामान आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहारसाठी अकोला जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. आंबिया बहारसाठी फळबागा असलेल्या शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त तापमान, जास्त पाऊस आणि गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे व फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे ही या योजनेची प्रमुख उदीष्टे आहेत.

अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारपैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. तसेच केवळ उत्पादनक्षम फळबागानांच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. संत्रा पिकाचे उत्पादनक्षम वय ३ वर्ष, मोसंबी ३ वर्ष, डाळिंब २ वर्ष आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीस निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिक घेणारे कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यास पात्र आहेत.

अकोला जिल्ह्यात पुनर्ररचित हवामान आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहारच्या अंमलबजावणी करिता एचडीएफसी अर्गो (HDFC ergo) या विमा कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा व तालुका प्रतिनिधी खालीलप्रमाणे –

जिल्हा प्रतिनिधी सुनील भालेराव-९९२१२५००३३, तालुका प्रतिनिधी (अकोला/मूर्तीजापूर,बार्शीटाकळी) शुभम हरणे-८०८७९०३१७१, तालुका प्रतिनिधी(अकोट,तेल्हारा) सुजय निपाणे-७०५७५०२८७०, तालुका प्रतिनिधी, (पातूर,बाळापुर) रूपाली गाडगे-८९७६९२९४३०

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत समाविष्ट फळपिके,  विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी  भरावयाचा  विमा हप्ता खालीलप्रमाणे-

 

केळी- विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये प्रति हेक्टर, शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता ९१०० रुपये.

डाळिंब- विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये प्रति हेक्टर, शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता ६५०० रुपये.

मोसंबी- विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये प्रति हेक्टर, शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता ४००० रुपये.

संत्रा- विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये प्रति हेक्टर, शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता ६००० रुपये.

सहभागी होण्यासाठी पिकनिहाय मुदत-

शेतकऱ्यांनी विमा संरक्षण मिळण्यासाठी  केळी, मोसंबी या फळपिकाकरिता दि. ३१ ऑक्टोबर, २०२२, डाळींब करिता दि.१४ जानेवारी, २०२३ व संत्रा करिता दि.३० नोव्हेंबर, २०२२ या दिनांकापुर्वी सहभागी व्हावे.

अधिक माहितीकरिता तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी,उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम