महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा दुसरा टप्पा; शुक्रवार(दि.14) जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर


अकोला दि.7(जिमाका)-  नव उद्योजकांच्या अभिनव संकल्पनांना मूर्तरूप मिळून उद्योजकतेचा विकास व्हावा या हेतूने महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेचा दुसरा टप्पाची सुरुवात झाली आहे. यामध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्र दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेपासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट, अकोला येथे  आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना असणाऱ्या आणि नवउद्योजक होवू इच्छिणाऱ्या युवक-युवती आणि नागरिकांनी प्रशिक्षण शिबीर व संकल्पना सादरीकरणाचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. 

नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते. परंतु काही वेळा योग्य मार्गदर्शना अभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. याकरीता जिल्ह्यातील नागरीकांच्या नाविन्यपूर्ण नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र

            प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजकांची व्याख्याने, तज्ञ मार्गदर्शक व सल्लागारांची सत्रे, तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांचे संकल्पना सादरीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. सादरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा इ.),  ई- प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा व गतिशीलता आणि अन्य या क्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे प्रत्येकी दहा मिनिटात सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामधून जिल्हास्तरावर अव्वल तीन पारितोषिक विजेते घोषित केले जातील. त्यामध्ये प्रथम पारितोषिक 25 हजार रुपये, व्दितीय पारितोषिक 15 हजार रुपये तर तृतीय पारितोषिक 10 हजार रुपये दिले जाणार आहे.

17 ऑक्टोंबरला विजेत्यांना पारितोषिक वितरण  

            प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातील सर्वोत्तम तीन संकल्पनांमधून राज्यस्तरीय निवड तज्ञ समितीद्वारे अंतिम विजेत्यांची निवड करण्यात येईल. यामधून वरील नमूद सात क्षेत्रातील राज्यस्तरीय विजेत्यांना प्रथम पारितोषिक 1 लक्ष रुपये, व्दितीय पारितोषिक 75 हजार रुपये तर सर्वोत्कृष्ट महीला उद्योजिकांना 1 लक्ष रुपये असे 21 पारितोषिके दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी महामहिम राज्यपाल यांचे हस्ते राजभवन, मुंबई येथे वितरित करण्यात येणार आहे. तसेच, विजेत्यांना पेटेंट सहाय्य, इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/निधी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, तसेच सॉफ्टवेअर क्रेडीट्स, क्लाऊड क्रेडीट्स इत्यादी सारखे लाभही पुरविण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरणासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, युवक-युवती व नाविण्यपूर्ण नवउद्योजक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे संकेतस्थळ www.mahastartupyatra.in वर नोंदणी करावी आणि जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्रास दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट, बसस्टॅन्ड मागे, अकोला येथे  उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा. तसेच अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुसरा माळा, प्रशासकीय इमारत,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अकोला येथे अथवा दूरध्वनी 0724-2433849, भ्रमणध्वनी क्र. 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ