‘त्या’ जखमी बिबट्याचा मृत्यू जंतूसंसर्ग, उपासमार व न्युमोनियामुळे-उपवनसंरक्षक अर्जुना के.आर. यांचे स्पष्टीकरण

 अकोला,१३ दि.(जिमाका)-  आलेगाव वनपरिक्षेत्राजवळ मौजे राहेर देऊळगाव शकरशा भागात दि.८ रोजी जखमी अवस्थेत आढळून आलेल्या बिबट्याचा मृत्यू हा उपचारादरम्यान झाला असून हा बिबट्या त्यापूर्वी १० ते १२ दिवस आधीपासून अन्य वन्यप्राण्याशी झालेल्या झुंजीदरम्यान जखमी झाला त्या जखमांमध्ये झालेला जंतूसंसर्ग, उपासमार व न्युमोनिया मुळे झाला असावा,असे मत पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे,असे अकोला वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जूना के.आर. यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अर्जुना के.आर. म्हणतात की, अकोला व बुलडाणा वनविभागाच्या सिमेवर आलेगाव वनपरिक्षेत्राजवळ मौजे राहेर देऊळगाव शकरशा भागात दि.८ रोजी दुपारी तीन वा. च्या सुमारास बिबट जखमी अवस्थेत  असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांना मिळाली. त्याप्रमाणे वनपरिक्षेत्रातील रेस्क्यू पथक व अन्य कर्मचारी घटना स्थळावर दाखल झाले. तेथील नाल्या शेजारी झुडूपात कमी हालचाल करत असल्याच्या अवस्थेत त्यांना हा बिबट गुरगुर आवाज करीत व आजारी असल्याच्या अवस्थेत दिसला. पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव रक्षक बाळ कागणे व बुलडाणा वनविभाग पथक यांनी मिळून या बिबट्यास ट्रॅन्क्युलाईज गनद्वारे बेशुद्ध करुन त्याचेवर प्रथमोपचार करण्यात आले. त्याच घटनास्थळावर एका पिंजऱ्यात  घेऊन बिबट्याला अकोला येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयात  आणण्यात आले. तेथे उपचार करुन त्यास  पुढील उपचारासाठी गोरेवाडा येथे नेण्याचे ठरले होते. मात्र उपचारादरम्यान ‘त्या’ बिबट्याचा मृत्यू झाला.  त्यानंतर या बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानुसार, बिबट्याच्या अंगावरील जखमांमुळे त्यास जंतूसंसर्ग झाला, त्यात त्याची उपासमार होऊन बिबट्याला न्युमोनिआ  झाल्याने त्याचा मृत्यू झाला. जखमी बिबट्याच्या अंगावर असलेल्या जखमा ह्या १० ते १२ दिवसांपूर्वीच्या असल्याचे निदर्शनास आले असून या जखमा बिबट्याच्या अन्य वन्यप्राण्याशी  झालेल्या झुंजीदरम्यान झाल्या असाव्या, असे मत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. तथापि, बिबट्याच्या मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट व्हावे यासाठी  मृत बिबट्याच्या अवयवांचे नमुने न्याय वैद्यक विभाग अमरावती येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी वनगुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे, असे उपवनसंरक्षक अकोला अर्जूना के.आर. यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ