विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ अकोला जिल्हा अमरावती विभागात सर्वप्रथम


अकोला, दि.२४(जिमाका)- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ची निवडणूक प्रक्रिया सर्वोत्कृष्ट पार पाडल्याबद्दल मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यास्तरावर केलेल्या गुणांकनात अमरावती विभागातून अकोला जिल्हा सर्वाधिक गुणांकन होऊन प्रथम आला आहे, अशी माहिती आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ही निर्भय मुक्त व पारदर्शी वातावरणामध्ये पार पडली. या निवडणुकीसाठी राज्यातील निवडणुकीचे काम केलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दिलेले योगदान विचारात घेऊन या निवडणुकीसाठी प्रभावी व उत्कृष्ट कामगिरी केलेले जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला होता. याकरिता संबंधित जिल्ह्याकडून प्रस्ताव मागण्यात आले होते. या अनुषंगाने प्राप्त सर्व प्रस्तावांचे गुणांकन करण्यात येऊन विभागनिहाय उत्कृष्ट जिल्हे घोषित करण्यात आले. त्यामध्ये अमरावती विभागात मधून अकोला जिल्हा हा सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी आज घोषित केला आहे.
राज्यात पुणे विभागातील कोल्हापूर, नागपूर मधील गडचिरोली, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, कोकण विभागातील रायगड आणि नाशिक विभागातील नंदुरबार या जिल्ह्यांना देखील उत्कृष्ट निवडणूक प्रक्रिया पार पाडल्या बाबत पुरस्काराकरिता पात्र ठरविण्यात आले आहे. यानुषंगाने लवकरच अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले तसेच निवडणूक प्रक्रियेशी निगडित अन्य अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ‌ संपूर्ण अमरावती विभागामध्ये अकोला जिल्ह्याने उत्कृष्ट अशी निवडणूक प्रक्रिया राबवली. विशेषत्वाने दिव्यांगांचे मतदानाचे प्रमाण वाढावे याकरिता विशेष प्रयत्न केले. नमूद करण्यासारखी बाब म्हणजे अकोला जिल्ह्यात दिव्यांग मतदानाची टक्केवारी ही  ९१ टक्के एवढी होती. अकोला जिल्ह्यात दिलेल्या या विशेष योगदानाची दखल निवडणूक आयोगाचे स्तरावर घेण्यात येऊन अकोला जिल्ह्याचा उत्कृष्ट जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.अकोला जिल्ह्याला हा बहुमान मिळाल्यामुळे अकोला जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे तर सामुहिक प्रयत्नांचे यश- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ची प्रक्रिया उत्कृष्ट राबविल्याबद्दल अकोला जिल्ह्याला मिळालेला बहुमान हा सामुहिक प्रयत्नांचे यश आहे, अशी भावना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज व्यक्त केली. ते म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया राबविण्यात विविध घटना, असंख्य कर्मचारी- अधिकारी यांचा सहभाग असतो. ते अहोरात्र राबत असतात. या अहोरात्र निष्ठेने राबणाऱ्या हातांचे हे यश आहे, अशा शब्दात  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आपल्या यशाचे श्रेय सामुहिक प्रयत्नांना दिले.
मतदार जनजागृती व दिव्यांग मतदानाचा
टक्का ठरला कारणीभूत-  निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश खवले
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९मधील अकोला जिल्ह्याची कामगिरी ही सर्वच आघाड्यांवर उत्तम होती. तथापि मतदार जनजागृतीसाठी राबविलेले उपक्रम त्यामुळे वाढलेला मतदानाचा टक्का आणि विशेष म्हणजे दिव्यांग मतदारांच्या मतदानाचा टक्का ही कामगिरी लक्षणीय ठरली, अशा शब्दात उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांनी सर्व निवडणूक टिमचे अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज