महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यात दोन गावांत याद्या जाहीर; दिवसअखेर ३१३ जणांचे प्रमाणिकरण पूर्ण

अकोला, दि.२४(जिमाका)- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत आज अकोला जिल्ह्यातील दोन गावात कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या नावांची याद्या पहिल्या टप्प्यात जाहीर झाल्या आहेत.  गोरेगाव ता. अकोला व देगाव ता. बोरगाव येथील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आज प्रसिद्ध झाल्या. या याद्यांनुसार ९२६ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. त्यानंतर तात्काळ त्यांच्या आधार क्रमांक , बॅंक खाते क्रमांक व कर्ज खात्यातील रक्कम  यांची बायोमेट्रीक पडताळणी व प्रमाणिकरण करण्यात आले. आज सायंकाळ पर्यंत ३१३  शेतकऱ्यांची बायोमेट्रीक पडताळणी व प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण झाली होती.
            आज सकाळी कर्जमुक्तीच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्वतः देगाव आणि गोरेगाव येथे जाऊन भेट दिली. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे हे ही त्यांच्या समवेत होते. या याद्या त्या त्या तहसिलदारांमार्फत गावांत प्रसिद्ध करण्यात आल्या.  जिल्हाधिकारी पापळकर यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांना ऑनलाईन प्राप्त झालेले प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते व उपस्थितीत वितरीत करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कर्जमुक्तीचे समाधान दिसून आले.
 गोरेगाव बु. ता. अकोला येथे  गजानन महाराज मंदीर, ग्रामपंचायत कार्यालय गोरेगाव खु, व गोरेगाव बु., सेतू केंद्र गोरेगाव खु.,  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्या. शाखा गोरेगाव खु., कॅनरा बॅंक शाखा गोरेगाव खु.
तर  देगाव ता. बाळापूर येथे  ग्रामपंचायत कार्यालय देगाव, सीएसएससी सेंटर देगाव, सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया, विदर्भ कोकण ग्रामिण बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया वाडेगाव शाखा येथे याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. लोखंडे यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ११ हजार २४५ शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात आली आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात ९२६ शेतकऱ्यांची यादी आज प्राप्त झाली. त्यातील आज ३१३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण यशस्वी झाले.
पडताळणी न झाल्यास काय कराल?
काही शेतकऱ्यांना बायोमेट्रीक पडताळणी होण्यास अडचण निर्माण झाल्यास. उदा. बोटाचे ठसे न जुळणे इ. अशा शेतकऱ्यांनी पडताळणीसाठी तहसिलदारांकडे जावे. तर ज्या शेतकऱ्यांना कर्जखात्यातील रकमेबाबत वा बॅंक खात्याबाबत पडताळणी होत नसेल अशांनी मात्र जिल्हास्तरीय समितीकडे जावे,असे जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रविण लोखंडे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज