खरीप हंगामाकरीता स्थानिक पातळीवर सोयाबीन उपलद्धतेसाठी घ्यावयाची काळजी


        अकोला,दि. 26 (जिमाका)-   अमरावती विभागातील सोयाबीन पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र  14.51 लाख हेक्टर असुन या पिकाखालील पेरणी क्षेत्रामध्ये दिवसेंदवस वाढ होत आहे. त्यामुळे वाढणा-या क्षेत्रसाठी जास्तीच्या बियाण्याची गरज भासणार आहे.  राज्यामध्ये सन 2019 मध्ये  उशिरा पाऊस व सोयाबीन पिकाच्या काढण्याच्या  कालावधीतील  अवेळी पावसामुळे सोयाबीन बियाणे उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  बीज उत्पादन क्षेत्रावर उत्पादन झालेले बियाणे व तसेच राज्यातील शेतक-यांनी मागील दोन हंगामामध्ये प्रमाणित बियाण्याची पेरणी  करून  उत्पादित केलेले बियाणे हे पुढील खरीप 2020  साठी व्यवस्थितपणे राखून ठेवणे/साठा करून ठेवणे गरजेचे आहे.
            सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने राज्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ  वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता  नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित  बियाण्यांपासून उत्पादित चांगल्या  प्रतीच्या  बियाण्यांची चाळणी करून निवड  करावी.   सोयाबीन बियाण्याची बाह्यावरण कवच नाजूक व पातळ  असल्याने त्याची हाताळणी काळजीपुर्वक करावी. साठवण करण्यापुर्वी   बियाणे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ताडपत्री/ सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरून चांगले वाळवावे व बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण 9 ते 12 टक्के  पर्यंत आणावे.  सोयाबीन बियाणे साठवणुक करण्यासाठी बियाण्याची घरगुती पद्धतीने उगवणशक्ती तपासावी आणि  किमान 70 टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे  योग्य पद्धतीने साठवणूक करावे.  स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या/नविन पोत्यात साठवुन ठेवावे. सोयाबनी बियाणे हवेतील  आर्द्रता  लवकर शोषून घेत त्यामुळे  साठवणीचे ठिकाण  थंड ओलविरहित व हवेशीर असले पाहिजे. साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करून नये. बियाणे साठवतांना त्याची थप्पी 7 फुटांपेक्षा  जास्त असणार नाही याची काळजी  घ्यावी. बियाणे 100 किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करतांना 4 पोत्यांपेक्षा जास्त व 40 किलोच्या पोत्यांमध्‍ये भरलेले असल्यास 8  पोत्यांपेक्षा जास्त मोठी थप्पी  लावू नये. अन्यथा सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्याची उगवण  शक्ती  कमी होते. पोत्यांची थप्पी जमिनीपासून 10 ते 15 सेंटीमीटर उंचीवर लाकडी फळ्यांवर लावावी . पोत्याची रचना उभ्या –आडव्या पद्धतीने  करावी, म्हणजे  हवा खेळती राहून बियाण्यांची गुणवत्ता  व उगवणशक्ती जास्त काळ  टिकण्यास मदत होते. आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये  किटननाशक व  बुरशीनाशकाचा वापर करावा तसेच उंदरांचा उपद्रव टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. सोयाबीनच्या बियाण्याच्या पोत्यांची हाताळणी व वाहतूक काळजीपुर्वक करावी.  पोती उंचावरून आदळली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
            खरीप हंगाम 2020 मध्ये सोयाबीन  उपलद्धतेची व्याप्ती वाढवावी व सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी  शेतकरी बांधवांनी उपरोक्तप्रमाणे काळजी घेण्याची आवश्यकता आहे असे आवाहन विभागीय  कृषि  सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले आहे.
                                                                            00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज