सुजलाम सुफलाम अकोला प्रकल्प अंतर्गत कार्यशाळा ;जलसंधारण, पाणंद रस्ते निर्मितीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


            अकोला,दि.१३(जिमाका)- महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटनेमार्फत राबविण्यात येत असलेल्या  सुजलाम सुफलाम प्रकल्पांतर्गत गावांमध्ये करावयाच्या पाणंद रस्ते विकास व जलसंधारण कामांसाठी  गावकऱ्यांची एकजूट आणि लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  आज येथे केले.
            येथील नियोजन भवनात या संदर्भात सरपंच तसेच जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत या प्रकल्पाची माहिती देऊन त्याद्वारे करावयाच्या कामांबाबत माहिती देण्यात आली.  यावेळी  प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया,  भारतीय जैन संघटनेचे संचालक  सुशांत भुयान,  राज्य प्रकल्प व्यवस्थापक नंदकिशोर लोंढे,  लेखा अधिकारी मिलिंद साधू, जिल्हा व्यवस्थापक नितीन राजवैद्य,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक तसेच उपजिल्हाधिकारी (रोहयो) बाबासाहेब गाढवे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ आदी उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की,  या अभियानाअंतर्गत गावात पाणंद रस्ते तयार करावयाचे आहेत. त्यात  रस्त्यांच्या दोन्ही बाजूला जलशोषक चर खोदून त्यातून रस्त्याचे माती काम करावयाचे आहे. तसेच गावातील जलसंधारणाची कामे, तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, नाल्यातील गाळ काढणे इ. कामे करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री ही भारतीय जैन संघटनेमार्फत मोफत देण्यात येणार आहे.  फक्त डिजेल व मशिन चालकाचे मानधन हे लोकसहभागातून द्यावयाचे आहे. त्यासाठी गावातील कोणती कामे करावयाची यावर एकमत होऊन त्यानुसार नियोजन होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी गावात सामंजस्य असणे आवश्यक आहे. तसेच लोकसहभाग या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे, असे जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले.
            राज्य प्रकल्प व्यवस्थापक नंदकिशोर लोंढे यांनी तसेच प्रा. सुभाष गादिया यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी गाढवे यांनी  पाणंद रस्ते विकासासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व आभार प्रदर्शन उपजिल्हाधिकारी गाढवे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज