उद्योगवाढीस पूरक धोरणांची अंमलबजावणी करा पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश


अकोला,दि.२०(जिमाका)- जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग करतांना, त्याचा विस्तार करतांना येणाऱ्या अडीअडचणींची सोडवणूक  करतांना राज्याच्या उद्योगवाढीस पूरक असणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी करा, असे निर्देश राज्याचे  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज येथे दिले. तसेच एम आय डी सी च्या  विभागीय अधिकाऱ्यांनी  आठवड्यातील दोन दिवस अकोला येथे पूर्ण वेळ द्यावा,असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
 येथील अकोला इंडस्ट्रियल असोसिएशन सभागृहात जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत परिसरातील उद्योजकांच्या समस्यांच्या सोडवणूकीसाठी बैठक आज पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर,  मनपा उपायुक्त आवारे, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे निकम,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी तसेच अन्य विभागांचे अधिकारी व अकोला इंडस्ट्रियल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
 यावेळी एमआयडीसीचे अतिरिक्त प्रादेशिक कार्यालय  अकोला येथे स्थलांतरीत करणे, औद्योगिक क्षेत्रासाठी   कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजना,  कर्मचारी राज्य विमा निगम जिल्हा अकोला यांच्या इस्पितळाचे स्थानिक इस्पितळाशी संलग्नता करणे,  एम आय डी सी पोलीस स्टेशनची हद्द वाढ करणे,  महिला उद्योजकांना भूखंड उपलब्ध करुन देणे,  याशिवाय अन्य अनुषंगिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी ना. कडू यांनी निर्देश दिले की,  उद्योगामुळे रोजगारनिर्मिती होत असते. त्यामुळे उद्योग वाढीला चालना देणे या शासनाच्या धोरणाला सुसंगत असे निर्णय घ्यावे.  हा दृष्टिकोन ठेवूनच प्रशासनाने उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावावे.  यावेळी त्यांनी औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवणे,  वे ब्रीजची संख्या वाढविणे,  उद्योजकांच्या प्रलंबित कागदपत्रे व दाखल्यांसाठी स्वतंत्र शिबिर लावणे,  तसेच एमआयडीसीत येण्यासाठी व संलग्न रस्त्यांचा विकास करणे याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस अकोला इंडस्ट्रिज असोसिएशन चे  अध्यक्ष उन्मेषजी मालू, मनोज खंडेलवाल,  नरेश बियाणी,  नितीन बियाणी,  निखिल अग्रवाल,  आशिष खंडेलवाल व अन्य पदाधिकारी कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.
विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज येथे भेट
विदर्भ  चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या श्रावगी टॉवर्स येथेही ना. कडू यांनी व्यापारी बांधवांची भेट घेतली. यावेळी त्यांचे समवेत  सतिष व्यास,  अध्यक्ष राजकुमार बिलाला, अशोक डालमिया, वरिष्ठ उपाध्यक्ष  नितीन खंडेलवाल, निकेश गुप्ता तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी निवेदनातील मागण्या वाचून दाखविण्यात आल्या.  या मागण्यांचे निवेदन म्हणजे अकोल्याचा विकासाचा आराखडाच आहे, अशी प्रतिक्रिया ना. कडू यांनी दिली. ते म्हणाले की,  औद्योगिक वसाहतीस पाणीपुरवठा करणे या शिवाय अकोला शहराला व्यवस्थित पाणी पुरवठा करणे  आवश्यक आहे. त्यासाठी विविध पर्यायांचा अभ्यास करण्यास आपण निर्देश दिले आहेत.  शहरातील रस्ते सुंदर आणि चांगले करण्यासाठीही तरतूद केली आहे. हे प्रजेचे राज्य आहे. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात काम करतांना देश या भावनेचा अंगिकार करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज