अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून फुलली परसबाग


अकोला,दि.२४(जिमाका)- एरवी शासकीय कार्यालय म्हणजे रुक्ष, कोरडेपणाची अनुभूती मिळते असा एक सार्वत्रिक समज. पण अकोला जिल्हाधिकारी कार्यालय त्याला अपवाद ठरु पाहतंय. एकीकडे जनतेला द्यावयाच्या सेवा सुविधांसाठी झटणारा कर्मचारी व अधिकारी वर्ग हा आपल्या कृतिशीलतेतून नाविन्यता जपत असतो. शेवटी सरकारी अधिकारी- कर्मचारी म्हणजे आपल्यासारखीच माणसं असतात. अशाच अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपल्यातील सृजनशीलता जपत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चक्क परसबाग फुलवली आहे. या परसबागेने आता चांगले बाळसे धरले असून ती आता नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरते आहे.
शासकीय कामांचा उरक संपता संपत नाही, टेबलावरील फाईलींचा ढिग ओसरता ओसरत नाही. पण इथले  अधिकारी कल्पक, आपल्या कामांचा उरक जोपासतांनाच मिळणाऱ्या वेळेचा व असलेल्या जागेचा सदुपयोग करुन त्यांनी परसबाग फुलवली आहे. येथील अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेरील बाजूस लहानश्या जागेत ही परसबाग फुलली आहे. अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यासारख्या कल्पक अधिकाऱ्यांनी ही परसबाग प्रत्यक्षात फुलवली आहे. कार्यालयात येण्याआधी वा कार्यालयीन कामकाज आटोपल्यावर थोडे श्रमदान करुन लावलेली ही बाग आता चांगली बहरली आहे. बाळसेदार वांगी, फुललेली कोथिंबीर, पालक, कोबी, वाल, चवळी यासारखा भाजीपाला सोबत झंडू,गुलाबाची टवटवीत फुलं, बहरलेली तुळस पाहून  मनाला आलेली मरगळ क्षणार्धात नाहिशी होते.  शिवाय आता हा भाजीपाला नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला, तो ही वानोळा म्हणून चाखता येईल.  या परसबागेत केलेले श्रम हे नक्कीच सत्कारणी लागणारे आहेत. प्रयत्न लहान असला तरी तो स्तूत्य आहे. या स्तूत्य उपक्रमाला अर्थातच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा पाठींबा आहेच. दिवसभरातून एखादा शिपाई नळीने पाणी देऊन सिंचन करतो. अधिकारी- कर्मचारी आपल्या कामातून वेळ काढून  रोपांची निगा राखतात. खुरपणी वगैरे करतात. काडी कचरा वेगळा करतात. त्यामुळे हा कोपरा प्रसन्न आणि टवटवित झाला आहे.
अनेक सरकारी कार्यालयांकडे भरभक्कम जागा असते काही ठिकाणी माळी लावून बागा ‘मेन्टेन’ ही केल्या जातात. पण ते सरकारी काम म्हणून मात्र अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील ही अधिकारी कर्मचाऱ्यांनी फुलवलेली ही परसबाग म्हणजे कर्मभूमीशी जोडलेले ऋणानुबंध घट्ट करते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज