मराठी भाषा गौरव दिन भाषा असते संस्कृतीचा मानबिंदू- विजय दळवी



अकोला, दि.२ (जिमाका)-  मराठी भाषा ही आपली ओळख आहे. आपल्या वागण्या बोलण्यातून आपले व्यक्तिमत्वच नव्हे तर आपली संस्कृती दिसत असते. त्यामुळे भाषा हे केवळ एक संवाद माध्यम नसून भाषा ही आपल्या संस्कृतीचा मानबिंदू होय, असे प्रतिपादन आकाशवाणी अकोला केंद्राचे कार्यक्रम विभागप्रमुख तथा साहित्यिक  विजय दळवी यांनी केले.
 जिल्हा माहिती कार्यालय अकोला व   सुधाकरराव नाईक कला, विज्ञान व उमाशंकर खेतान  वाणिज्य महाविद्यालय , अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने  कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वि. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून आकाशवाणी केंद्र अकोलाचे कार्यक्रम विभाग प्रमुख विजय दळवी यांना आमंत्रित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ग्रंथमित्र बी.पी. पवार हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत बोबडे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने,  मराठी भाषा विभागप्रमुख डॉ. भास्कर पाटील, प्रा. एन. एफ.चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर व संत गाडगेबाबा यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन  करण्यात आले. आपल्या भाषणात श्री. दळवी म्हणाले की,  भाषा जिवंत असली तरच समाज जिवंत राहतो आणि समाज जिवंत असेल तर संस्कृती जिवंत राहिल. भाषेतून व्यक्तिमत्व प्रकट करता येते.  अनेक बोलीभाषांनी समृद्ध होणारी भाषा ही विविध भाषांचे शब्द स्विकारुन  परिपुष्ट होते.  आपणही आपल्या सभवतालच्या बोलीभाषांचा स्विकार करुन भाषा सृदृढ  करु या. अलिकडच्या मोबाईल संभाषणात इमोजीच्या वापरामुळे भाषा आक्रसते की काय? अशी भिती वाटते.  मराठी भाषा ही व्यवहारात, साहित्य, कला प्रांतात  प्रचलित आहे, विविध माध्यमात ती स्विकारली जाते. त्यामुळे मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना जाहिरात, दूरचित्रवाणी,रेडीओ, डिजीटल माध्यमे अशा विविध ठिकाणी रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतायेत,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भास्कर पाटील यांनी केले तर जिल्हामाहिती अधिकारी डॉ. दुसाने यांनी आयोजना मागील हेतू स्पष्ट केला. यावेळी प्राचार्य डॉ. बोबडे यांनीही आपले मार्गदर्शन केले. तर अध्यक्ष बी.पी . पवार यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण केले. त्यास उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन.एफ. चव्हाण यांनी केले तर महाविद्यालयाच्या वाड.मय मंडळाचे गणेश लोणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कुसुमाग्रजांच्या गर्जा जयजयकार क्रांतीचा  ही कविता कार्यक्रमाच्या शेवटी सादर केली तर राष्ट्रगिताने सांगता झाली. कार्यक्रमाला  विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.
०००००      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज