पोकरातंर्गत शेतीदिन व चर्चासत्र चौकटीबाहेर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार - कृषीमंत्री ना. दादाजी भुसे










अकोला, दि. 6 (जिमाका):  तळागाळातील शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी, शेतकरीभिमुख योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी गरज वाटल्यास चौकटीबाहेर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे  यांनी अकोला तालुक्यातील घुसर येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेती दिन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते ,त्यावेळी ते बोलत होते.
 यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरीया, जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर, पवन बुटे,  पंचायत समिती सदस्य बाळूभाऊ गव्हाळे , घुसरचे सरपंच निर्मलाताई गवळी, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, पोकराचे विषय तज्ञ रफिक नाईकवाडी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे किटक शास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त ठिपसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ , उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुळकर्णी, तहसीलदार विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी शलाका सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
शेतकऱ्यांना विविध पिकांची पेरणी ते काढणीपर्यंत प्रात्यक्षिक करण्यासाठी शेतीशाळेचे आयोजन करण्यात येते, असे सांगून कृषिमंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे पिक कर्ज, नाला खोलीकरण, मत्स्यशेती  ,तलावाचे पुनर्भरण यासारखे खारपाणपट्ट्यातील समस्या सोडविण्यात येतील.  शासनाने दोन लाखावरील थकित कर्ज व नियमित कर्ज यासंबंधी कार्यवाही करण्यासाठी उपसमिती नेमली असुन या समितीचा अहवाल लवकरच शासनाला सादर करण्यात येईल. याबाबत शेतकऱ्यांना उत्साहवर्धक निर्णय घेऊन गोड बातमी देण्यात येणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री यांनी दिली.
यावेळी घुसर  येथील शेतक-यांशी  कृषीमंत्री  ना. भुसे यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या.  अडचणी स्थानिक स्तरावर सोडविता  याव्यात  यासाठी  प्रत्येक तालुका  कृषी अधिका-यांच्या  कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष निर्माण करण्यात आलेले आहे. शेतक-यांनी  आपल्या समस्या तेथे मांडाव्यात शासन स्तरावर असलेल्या समस्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे कृषीमंत्री यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक एन.डी. वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला घुसर व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषीमंत्री  ना. भुसे यांनी पोकरा योजनेअंतर्गत घुसर येथील नंदलाल डहाके यांच्या हरभरा पिकाच्या बीजोत्पादन क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. घुसर येथील तात्याराव चोपडे यांच्या शेतात किड बंदोबस्तासाठी लावलेल्या फेरोमन सापळ्याची पाहणी केली. तसेच वाकी येथील कैलास गोटे यांच्या कापसाच्या शेतातील कापूस वेचणा-या महिला मजुरांची आस्थेने चौकशी केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज