महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना: फक्त अंगठा लावला आणि कर्जमाफःशेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान



अकोला, दि.२५ (जिमाका)- फक्त आधार नंबर तपासला बायोमेट्रिक अंगठा लावला, आणि कर्जमाफ झाले. फक्त एकाच फेरीत हे काम झाले, त्याबद्दल शासनाचे मनापासून धन्यवाद, अशा शब्दात शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती आणि कर्जमुक्तीच्या साध्या सोप्या प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त केले.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील दोन गावांतील शेतकऱ्यांना लाभ मिळाला. तशा याद्या सोमवारी (दि.२४) जाहीर झाल्या होत्या. आज दुसऱ्यादिवशीही  देगाव ता. बाळापूर आणि गोरेगाव ता. अकोला येथील पात्र लाभार्थी आपले आधार क्रमांक व बायोमेट्रीक प्रमाणिकरणासाठी जमले होते. अगदी सोप्या प्रक्रियेने माफ होणारे कर्ज याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
 गोरेगाव खु. येथील  मधुकर बळीराम वास्कर यांचे ३१ हजार १५६ रुपयांचे कर्ज माफ झाले. ते म्हणाले की, सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कर्जमुक्तीचा शब्द पाळला. त्यामुळे आम्ही सारेच शेतकरी आनंदीत आहोत. इथं येऊन केवळ आमचे अंगठे मशिनवर ठेवले, कर्जाची रक्कम तपासली आणि लगेच कर्ज माफी झाली. शासनाचे मनापासून आभार.
तेजराव माणिक भामरे म्हणाले की, माझं यादीत नाव आलं हे मी पाहिलं, आधार क्रमांक, बॅंक पासबुक घेऊन इथं सोसायटीच्या ऑफिसला आलो. इथं माझा अंगठा बायोमेट्रिक स्कॅन झाला.आणि लगेच कर्जमाफीचा कागद प्राप्त झाला. इतकी सोपी ही प्रक्रिया असेल असं वाटलं नव्हत. सरकारने बोलल्याप्रमाणे करुन दाखवलं.आम्ही सारे शेतकरी त्यामुळे आनंदी आहोत.
शेख रशिद शेख हुसेन म्हणाले की, माझी कर्जमाफी झालीय, आणि मला त्याचा काहीही त्रास झाला नाही. कर्जमाफीसाठी मी फक्त आजच आलो आणि आजच मला कर्जमाफी झाल्याचे पत्र लगेचच मिळाले. शासनाने वचन दिल्याप्रमाणे कर्जमुक्ती दिली.
नितेश भानुदास ढोरे रा. गोरेगाव यांची ७३ हजार ३६१ रुपयांची कर्जमाफी झाली.  ते म्हणाले की शासनाने दिलेला शब्द पाळला. शिवाय ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की विचारता सोय नाही. शासनाने दिलेल्या या कर्जमुक्तीबद्दल आम्ही खुप समाधानी आहोत.  केवळ अंगठा लावला आणि कर्जमाफ झालं, इतकी ही सोपी पद्धत आहे.
निर्मला रामभाऊ गावंडे रा. गोरेगाव खु. या महिला शेतकरी म्हणाल्या की, माझी ८२ हजार ७५६ रुपयांची कर्जमाफी झाली, पण मला काहीच त्रास झाला नाही. फक्त अंगठा दिला आणि कर्जमाफ झालं. आमचं कर्जमाफ करण्याचा शब्द  पाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आभार.
गुणवंत श्रीराम ठोंबरे रा. गोरेगाव खु. या शेतकऱ्याची ६४ हजार ६४७ रुपयांची कर्जमाफी झाली.  केवळ आधारकार्ड, बॅंक पासबुक आणले यादीतील नाव होतेच. लगेच बायोमेट्रिक अंगठा दिला  आणि कर्जमाफीचा दाखला मिळाला.
रामकृष्ण मनोहर सोनटक्के  रा. देगाव ता. बाळापूर म्हणाले की,  त्यांचे एक लाख ६८ हजार ६७१ रुपयांचे कर्ज माफ झाले. मोठा दिलासा मिळाला. अक्षरशः एका मिनीटात कर्ज माफ झाले. आधार क्रमांक दिला, बायोमेट्रिक अंगठा स्कॅन केला आणि लगेचच कर्जमाफी झाली.
देगावचेच गजानन शामराव बेलसरे म्हणाले की,  कोणत्याही प्रकारची पायपीट न करता ही कर्जमुक्ती झाली. माझं एक लाख १३ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. याबद्दल शासनाचे आभार.
सौ.मनोरमा रमेश दाळू रा. देगाव या महिला शेतकरी म्हणाल्या की , माझे एक लाख ६३ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले. कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.  त्याबद्दल शासनाचे आभार.
कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या नावांची याद्या पहिल्या टप्प्यात सोमवारी दि.२४ ला चाचणीसाठी जाहीर झाल्या आहेत. जिल्ह्यातील  गोरेगाव ता. अकोला व देगाव ता. बोरगाव या दोन गावातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर तात्काळ त्यांच्या आधार क्रमांक , बॅंक खाते क्रमांक व कर्ज खात्यातील रक्कम  यांची बायोमेट्रीक पडताळणी व प्रमाणिकरण सुरु झाले आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत  ५६७ शेतकऱ्यांची बायोमेट्रीक पडताळणी व प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण झाली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज